६ लाख मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ
टीम सिटी टाइम्स भंडारा | लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे म्हणून निवडणूक विभागाकडून शासन स्तरावर मतदार जनजागृती, प्रसार मोहीम राबविण्यात आली. जिल्हाभर या मोहिमेचा तसा गाजावाजाही कऱण्यात आला. परंतु तब्बल भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात ६ लाख मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याने प्रचार,प्रसार मोहीम नापास झाल्याचे दिसून येते.
गेल्या १९ एप्रिल २०२४ रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या लोकसभा क्षेत्रात ६ विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदान जनजागृतीसाठी शासन स्तरावर कितीही प्रचार आणि प्रसिद्धी केली गेली असली तरी या क्षेत्रात ६७.०४ टक्के मतदान झाल्याने शासनाची मतदार जनजागृतीची प्रचार योजना मोहीम निवडणुकीच्या परीक्षेत सर्व स्तरावर नापास ठरल्याचे चित्र दिसून येते.
शासन स्तरावर ही मतदार जनजागृती मोहीम राबविली गेली नसती तरीही जवळपास एवढेच मतदान झाले असते. मग मतदार जनजागृती मोहिमेचे फलित काय? जिथे शासकीय कर्मचाऱ्यांनीच निवडणुक विभागाच्या नविन नियमावलीमुळे मतदानाकडे पाठ फिरविली तिथे सर्वसामान्य मतदारांचे काय ?
निवडणुक विभागाने टपाली मतपत्रिका प्रक्रिया बदलायची होती तर निवडणुकीच्या पहिल्या प्रशिक्षणाच्या वेळी व प्रसिध्दी माध्यमाद्वारे निवडणुक कर्मचाऱ्यांना तशी सूचना देणे गरजेचे होते. एकदम दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण स्थळी मतदान करण्यास सांगण्यात आले.परंतु कर्मचाऱ्यांची झुंबळ असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी या मतदानाकडे कानाडोळा केला.
वास्तविक बघता स्थानिक लोकसभा क्षेत्रातील मतदार कर्मचाऱ्यांना त्यांच्याच बुथवर मतदान करता येऊ शकत होते. कारण यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या बुथवरच मतदान केले.
मग हा नवा मतदानाचा फंडा कळायला मार्ग नाही. निवडणूक निकालाच्या अगोदर मतदानापासून वंचित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान पेपरची व्यवस्था करून दिल्यास मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
कोण ठरणार पॉवरफुल,कुणाची होणार बत्तीगुल?
भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्राची निवडणूक आटोपली खरी, पण या क्षेत्रात राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.फक्त एक विधानसभा क्षेत्र वगळला तर सर्वच विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची सध्यातरी हवा वरचढ असल्याचे मतदारामधील चर्चेतून दोन्ही जिल्ह्यात दिसून येत आहे. जर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसची हवाअसेल तर मग विरोधी पक्षाच्या कोणत्या उमेदवारावर मतदारांनी नाराजी दर्शवली ? हे देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
कदाचित नवीन चेहरा, उच्चशिक्षित उमेदवार काँग्रेसने दिल्याने या क्षेत्रात बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकमात्र खरे या लोकसभा क्षेत्रात काँग्रेसच्या विजयाचे चित्र स्पष्ट जरी नसले तरी धूसरही नाही.
हि लोकसभा निवडणुक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते खा.प्रफुल्ल पटेल व भाजपाकरिता अतिशय प्रतिष्ठेची होती.या निवडणुकीत कोण बाजी मारणार? व कोणाची बत्ती गुल होणार हे ४जुनला जाहिर होणाऱ्या निकालानंतर स्पष्ट होइल.
यावेळी लोकसभा क्षेत्रात ६ लक्ष २,२३२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. त्यामुळे हे मतदान कोणत्या उमेदवाराला अडचणीत आणणार ही वेळच सांगेल.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार क्षेत्रात १८ लाख २७ हजार १८८ मतदार आहेत.यात १२लाख २४ हजार ९५६ मतदारांनी मतदान केले.
२०१९ मधील मतदानाची आकडेवारी
तुमसर ७०.२६टक्के,भंडारा ६५.७६टक्के,साकोली ७१.६५टक्के,अर्जुनी/मोरगाव ७१.४१टक्के,तिरोडा ६८.०८ टक्के, गोंदिया ६४.४१टक्के.
२०२४ मधील मतदानाची आकडेवारी
तुमसर ६७.५३टक्के,भंडारा ६६.०६टक्के, सकोली ७१.३२ टक्के, अर्जुनी/मोरगाव ७०.८७ टक्के, तिरोडा ६२.८३टक्के, गोंदिया ६३.७४टक्के.