टीम सिटी टाइम्स लाखनी | तालुक्यातील अनेक रूग्ण उपचारासाठी लाखनी येथील ग्रामीण रूग्णालयात येतात. जास्त तब्येत खराब असलेल्या रूग्णांना उपचारासाठी तीन दिवस राहण्यची सोय करण्यात आली आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत रूग्णांवरती उपचार केले जातात.
प्राप्त माहीतीनुसार , लाखनी येथील ग्रामीण रूग्णालयातील प्रभाग क्रमांक १ मधील स्वच्छतागृहात कमालीची अस्वच्छता आढळून येते. निवासी रूग्णांना शिस्तीत राहण्याचे मार्गदर्शन करण्यात येत नसल्यामुळे ही अस्वच्छता दिसून येत आहे.
तोंड धुण्याचे बेसीन खर्रा , तंबाखूने भरलेले आहे. तसेच बेसीनमध्ये उरलेले अन्नसुद्धा आढळून आले आहे. निवासी रोग्यांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. रोग्यांच्या ताटातील न खाल्लेले अन्न बाहेर न फेकता एका ठिकाणी साठवून ठेवण्यासाठी मोठया बादलीची व्यवस्थाही करण्यात आली नाही.
संडास खोलीमध्ये दिवाबत्तीची सोय नाही. बादली असून डब्याची सोय नाही. स्नानगृहे अस्वच्छ आहेत. याचा रूग्णांना विशेषाताः वयोवृद्धांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण रूग्णालय प्रशासनाने या गैरसोयींची दखल घेत योग्य ती स्वच्छता ठेवावी व निवासी रोगी व त्यांच्या नातेवाईकांनीही स्वच्छता ठेवण्यात हातभार लावावा असा विचार व्यक्त होत आहे.