टीम सिटी टाइम्स भंडारा | सध्या शाळेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपून सुट्टया लागल्या आहेत, वातावरणात अधिक उष्णता असल्याने भर उन्हात वेळ घालविण्यासाठी लहान बालके कॅरम, बुद्धिबळ यासारखे घरातील खेळ खेळत आहेत,
मात्र युवकांना हा वेळ मनोरंजन म्हणून घालविण्यासाठी भंडारा शहर तथा ग्रामीण भागात सध्या सापशिडी, लुडो, तीन पत्तीच्या ऑनलाईन खेळातून तरुणाईला जुगाराचे व्यसन लागले असून ही तरुणाई जुगारात गुरफटली फडकली जावू लागली आहे.
पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीतील मनोरंजनाचे साधन म्हणून सापशिडी, लूडो, तीन पत्ती या खेळांकडे पाहिले जात होते. मात्र इंटरनेटच्या युगात या खेळांना आता जुगाराचे स्वरूप प्राप्त झाला आहे. मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील तरुणाई या ऑनलाइन जुगाराकडे आकर्षित झाली असून, यामध्ये किशोरवयीन मुलांचेही प्रमाण लक्षणीय आहे.
विशेष म्हणजे, स्कील गेमच्या नावाखाली हे प्रकार सुरू असून, यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ऑनलाइन गेममुळे अनेकांच्या आयुष्याचा खेळ होत आहे.
इंटरनेटच्या विविध साइटवर हे अँप उपलब्ध आहेत. त्यावरून हे गेम डाउनलोड करण्यात येतात. अँपवर आपला स्वतःच्या आयडी तयार करावा लागतो. यासाठी दोन प्रकार आहेत. पहिला प्रकारात पूर्वीपासून त्यावर आयडी असलेली मंडळी नवीन युजर्सचे नाव आणि मोबाईल क्रमांक ॲपच्या एडमिनला रेफर करतात.
यानंतर एडमिन यूजर्सशी संपर्क साधून त्यांचा आयडी तयार करतो. दुसऱ्या प्रकारात जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास समोरील व्यक्ती आयडी तयार करून देतो.आपल्या आयडीवर लॉगिन केल्यानंतर युजर्स पाहिजे त्या खेळाला जुगार खेळण्यासाठी निवडू शकतो. यामध्ये त्याने जितकी रक्कम आयडीवर डिपॉझिट केली असेल, त्याच प्रमाणात तो खेळू शकतो.
जितकी रक्कम लावली, त्याच्या डबल रकमेचे आमिष खेळाडूंला दाखविण्यात येते. यदा कदाचित जिंकल्यास रक्कम युजर्स विड्रॉल करून घेऊ शकतो. यासाठी अँपची दुसरी टीम विड्रॉलचे काम करते. या टीमच्या व्हाट्सअप क्रमांकावर युजर्सचा आयडी क्रमांक आणि बँक खात्याची माहिती पाठवावी लागते. त्यानंतर काही वेळात त्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. हरल्यास लावलेली रक्कम गमवावी लागते.
जाहिरातीच्या माध्यमातून भुरळ
सोशल मीडियाचे फेसबुक, इंस्टाग्राम, तसेच विविध चैनलवर सध्या नियमित ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती दिसून येत आहेत. यामध्ये तीन पत्ती, जंगली रम्मी, लुडो तसेच क्रिकेटशी संबंधित खेळांच्या जाहिरातींचाही समावेश आहे. जाहिरातीच्या माध्यमातून या जुगाराच्या खेळाकडे आकर्षित करून तरुणाईला भुरळ येत आहे.