टीम सिटी टाइम्स लाखनी | लाखनी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या नियतक्षेत्र सेलोटी येथे गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने तीन शेळ्या ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता.२८) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पशुपालकाचे नाव नामदेव विठोबा मिराशे रा. सेलोटी, तालुका लाखनी असे असून त्यांचे अंदाजे ३३ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. क्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले, वनरक्षक त्रिवेणी गायधने यांनी पंचनामा केला असला तरी पशूपालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नामदेव मिराशे हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीस पूरक व्यवसाय म्हणून ते शेळी पालनाचा व्यवसाय करतात. गुरुवारी रात्री घरच्या पाळीव प्राण्यांना चारापाणी करून गोठ्यात बांधले व कुटुंबीयांसह ते झोपी गेले असता पहाटेच्या सुमारास अचानक गोठ्यात शिरून बिबटाने हल्ला केल्याने शेळ्यांनी आरडा-ओरड केली असता झोपमोड झाल्यामुळे पशूपालकाने गोठ्यात जाऊन पाहिले असता तीन शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या.
पशुपालकात भीतीचे वातावरण
सरपंच सूरज निखाडे यांनी घटनेची माहिती पोलिस आणि वन विभागाला दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले, वनरक्षक कु.त्रिवेणी गायधने, मदतनीस मयुर गायधने घटनास्थळी गेले व मृत शेळ्यांचा पंचनामा करून पोहरा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मदीकुंटवार यांनी माहिती देण्यात आली. त्यांनी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करून शेळ्यांना जमिनीत पुरण्याच्या सूचना दिल्या.
घटनास्थळावरून पगमार्क वरून बिबट असल्याचा वन कर्मचाऱ्यांनी अंदाज वर्तविला आहे. या घटनेमुळे पशुपालकांसह गावकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या बिबटाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.