टीम सिटी टाइम्स लाखांदुर | बारव्हा येथे मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय असून सुद्धा खुलेआम रेती तस्करी सुरु आहे. मात्र या रेती तस्करावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नाही. हे मात्र महसूल विभागाचे दुर्दैव आहे. ज्यांच्या खांद्यावर रेती तस्करीवर आळा घालण्याची जबाबदारी शासनाने दिली. तेच महसूल कर्मचारी डोळ्यादेखत रेतीची तस्करी होतांना मूग गिळून बघ्याची भूमिका पार पाडत असतील तर अशा या महसूल कर्मचाऱ्याचा काय उपयोग? असा सवाल ग्रामस्थानी उपस्थित केला आहे.
लाखांदूर तालुक्याला चुलबंद नदीचे वैभव प्राप्त झाले आहे. अनेक गावा शेजारून नदी वाहत असून घाटही निर्माण झाले आहेत. त्याचप्रमाणे बारव्हा येथील नंदिघाटावर मरेमाय म्हणून घाट आहे. या घाटात मुबलक प्रमाणात रेतीसाठा उपलब्ध आहे. सद्यास्थितीत कोणतेही रेती घाट सुरु न झाल्याने रेती तस्कराच्या नजरा या घाटावर असून मागिल एक ते दोन महिन्यापासून येथील घाटातून दिवस व रात्र पहाटेला रेतीची मोठया प्रमाणात चोरी करण्यात येते.
याची माहिती बारव्हा येथील तलाठी बिसेन व मंडळ अधिकारी मदनकर यांना असून या रेती तस्कराचे हितचिंतक असल्याचे गावात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे संबंधित रेती तस्करीची ग्रामस्थांनी तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याची नागरिकांत चर्चा आहे.
रोजाना या रेती घाटातून जवळपास १० ते १५ ट्रिप रेती उपासा खुलेआम करण्यात येऊन परिसरातील गावात दिनदहाडे पोहचविण्यात येत आहे. अश्या या रेती तस्करावर कार्यवाही करणार कोण? कोणी दबंग महसूल कर्मचारी कार्यवाही करणार काय? दोन दिवसापूर्वी चिचाळ येथे अवैध मुरूम दुलाईचा ट्रॅक्टर पकडण्यात आला.
मात्र त्याच्या कडून काही आर्थिक चिरीमिरी घेऊन त्याला सोडून देण्यात आल्याचीही चिचाळ वाशियात चर्चा आहे.बारव्हा येथिल एक रेती तस्कर दररोज १० ते १२ ट्रिप रेती मरेमाय घाटातून काढून परिसरात खुलेआम पोहचवितो. मात्र पोलीस व महसूल अधिकारी त्याच्यावर कोणतीही कार्यवाही करीत नसल्याचे दिसून येत आहे.