टीम सिटी टाइम्स लाखनी | शहरातील राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील सर्व्हिस रोडवर व मुख्य मार्गावर अतिक्रमणांचा विळखा घट्ट होत आहे. अतिक्रमण करण्याची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यावरील पदपथांवर हातगाड्या थांबून असतात.
रस्त्यावर हातगाडी विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे लाखनी नगरपंचायतचे अक्षरशः दुर्लक्ष होत आहे. अधिकारी झोपेचे सोंग घेत असून, कारवाईचा पत्ताच नाही.
अतिक्रमण करणाऱ्यांचे शहर म्हणून लाखनी शहराची ओळख बनू लागली आहे. मुख्य बाजारपेठ असलेले सिंधी लाईन चौक, पंचायत समिती परिसर, तहसील कार्यालय परिसर याठिकाणी हातगाड्यांचा ठिय्या, खासगी प्रवासी, वाहनांचा थांबा यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. या परिसरात नेहमी छोटे-मोठे अपघात होतात,तर काहींना आपला जीवही गमवावा लागला.
शहरातील पंचायत समिती, तहसील कार्यालय,सिंधी लाईन, बसस्थानक परिसर,गांधी विद्यालय, कुमार पेट्रोल पंप परिसरासह लाखनी शहरात अतिक्रमणाचे जाळे तयार झाले आहे. दुकानदारांनी रस्त्यावर छत मारून विक्रीसाठी वस्तू मांडल्या आहेत.नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही कारवाई केली जात नाही.वाहतुक आणि रस्ते अडवणाऱ्यांवर कारवाईसाठी अनेकदा पोलिसांनी प्रयत्न केले.
विशेष म्हणजे, आठवडी बाजारात आलेले नागरिक पंचायत समिती जवळील उडानपुलाच्या खाली आपले खासगी वाहने लावून ठेवतात त्यामुळे सामान्य नागरिकांना ये-जा करण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागतो.
मात्र, नगरपंचायत लाखनी व्यवसाय करणाऱ्या किरकोळ भाजी विक्रेते व हाताठेलेवाले यांच्याकडून दैनंदिन पावती देऊन पैसे घेतात. त्यामुळे या किरकोळ व्यावसायिकांना रस्त्यावर दुकान थाटण्याचे बळ मिळत असल्याची नागरिकांत चर्चा सुरू आहे. दुकानाबाहेरील फलकापासुन ते थेट टेबल, हातगाडी, गॅरेजची पेटी ठेवण्यापर्यंत अतिक्रमण वाढलेआहे.याकडे स्थानिक नगरपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
बाजारात चालता येईना
शहरातील बाजार परिसरातील मुख्य व सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विविध विक्रेत्यांनी अतिक्रमण करून जागा व्यापली आहे.अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर असल्याने बाजारातून नागरिकांना साधे पायी चालत जाणे अवघड होत आहे.
नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. त्यामुळे शहरातील मुख्य मार्ग व सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण काढण्याची मागणी सातत्याने होत आहे. या प्रकरणी नगरपंचायत काय भूमिका घेते ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.