टीम सिटी टाइम्स भंडारा | सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे. पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठा, दूषित जलस्त्रोत, पाईपलाईन गळती यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, कावीळ, विषमज्वर आदी आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जलजन्य साथीचे आजार होऊ नये यासाठी पावसाळ्यात प्रत्येक नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन डॉ. विजया ठाकरे नंदुरकर यांनी केले आहे. पिण्याचे पाणी शुद्ध केलेले वापरावे.
पाणी गाळून व दहा मिनिटे उकळलेले प्यावे, पिण्याचे पाणी झाकून ठेवावे, पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन गोळ्या किंवा द्रावणे वापरावे, जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे, शौचालयाचा वापर करावा तसेच शौचावरून आल्यावर हात साबणाने धुवावे, जुलाब झाल्यावर ओआरएस पाकिटे शासकीय दवाखान्यामधून घ्यावी तसेच दररोज ताजे अन्न सेवन करावे, शिळे अन्न खाऊ नये.
घराच्या परिसरात पाणी साचू नये याची दक्षता घ्यावी.कारण साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते व हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे आजाराची लागन होते. त्यामुळे प्रत्येकाने पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.
आपले कुटुंब आपली जबाबदारी समजून प्रत्येक कुटुंब प्रमुखांनी आला पावसाळा, आरोग्य सांभाळा व सुदृढ निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करावे.पाणी उकळून प्यावे,उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये, शिळे अन्न खाऊ नये.
डॉ. विजया ठाकरे नंदुरकर
भंडारा