टीम सिटी टाइम्स साकोली | भंडारा जिल्ह्यात १५०० च्या वर तलाव आहेत. भंडारा जिल्हा तलावांसाठी राज्यात प्रसिद्ध आहे.भंडारा जिल्ह्यात १३९ मत्स्यपालन संस्था आहेत.मागील अनेक वर्षापासून जिल्हयातील ढीवर समाज परंपरागत मासेमारी व्यवसाय करीत आहे.
परंपरागत मासेमारी करीत असल्याने भोई समाज तंत्रज्ञान शुद्ध मासेमारी करण्यात असमर्थ ठरत आहे. त्यामुळे प्रगत मासेमारी व्यवसाय करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व प्रशिक्षणाची भोई समाजाला नितांत गरज आहे.
एवढ्या वर्षांपासून भोई समाजाकडे मासेमारी करीता तलाव असूनसुद्धा तंत्रशुद्ध मासेमारी करण्यासाठी मच्छीमार संस्थांच्या सभासदांना योग्य ते प्रशिक्षण न मिळाल्याने ते पारंपरिक मासेमारी करत आहेत.
जर युद्ध पातळीवर संपूर्ण जिल्ह्यातील भोई समाजातील लोकांना मासेमारी करण्यासाठी योग्य ते निवासी प्रशिक्षण देण्यात आले व त्यांच्या तलावावर शासनाने जर विशेष लक्ष दिले तर जिल्हयात मासेमारीला मोठा वाव व व्यावसायिक पटल मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यासाठी भंडारा जिल्ह्यात साकोली येथे मत्स्य विद्यापीठ संस्था ज्याचे केंद्रस्थान नागपूर आहे,त्याचे उपकेंद्र साकोली येथे सुरू करण्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांनी केली आहे.
जर मासेमारीचे प्रशिक्षण केंद्र साकोली येथे सुरू झाल्यास स्थानिक मासेमार बांधवांच्या तलावातील मासेमारी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल व ढीवर समाज बांधवांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांनी यावेळी व्यक्त केले.