अतुल नागदेवे भंडारा | विधानसभा निवडणूक केवळ दोन महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील काही खालच्या फळीतील कार्यकर्ते सध्या एकमेकांवर टिकेची झोड उठवित आहेत.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जवळ येताच या शॉट गझनींच्या कारनाम्यातून काही सज्जनांचीही मानहानी होत असताना विरोधी नेते एकमेकांचे राजकीय उट्टे काढण्यासाठी या गझनींच्या खांद्यावर बंदूक ठेवून सोशल वॉर करत असल्याची चर्चा राजकीय रणांगणात होत आहे.
राजकारणात आपली लायकी काय? आपण काय बोलतो ? आपल्याला कोणते पद आहे? आपण कोणावर काय टीका करावी? याचे राजकीय भान आणि आत्मपरीक्षण न ठेवता राजकारणातील ‘मिडल क्लास’ फळीतील सर्वच राजकीय पक्षातील काही कार्यकर्ते
राजकारणाच्या नावाखाली स्वतःचीच छाप पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या नेत्यांच्या मागे फिरुन विरोधकांवर टिकेची झोड उठवून स्वतःची टिमकी वाजविताना राजकीय सारीपाटावर चमकोगिरी करीत आहेत. दरम्यान, ‘गझनीं’च्या या सोशल वॉरमुळे करमणूक होत आहे.
सोशल मीडियातून ही मंडळी सध्या वॉर करत असतानाच समाजात कोणाचे काही कामे असतील तर सांगा? मी लगेच मंत्र्यांशी बोलून तुमचे प्रश्न चुटकीसरशी सोडवितो, असे आश्वासन देऊन हे राजकारणातील काही शॉट गझनी चांगलेच भोळ्याभाबड्या लोकांना आशेला लावून ठेंगा दाखविताना दिसून येत आहेत. विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे शहाणे कार्यकर्ते विरोधी नेत्यांवर अवास्तव टीका करायला धजावत नसल्यामुळे अशा काही शॉट गझनींना राजकीय नेतेच हवा भरुन पुढे करुन देत आहेत.