टीम सिटी टाइम्स लाखनी | तालुक्यात बहुतांश शेती पावसाचे पाण्यावर अवलंबून असल्याने हलक्या प्रजातीच्या धानाची लागवड केली जाते. सध्या हलका धान गर्भार अवस्थेत आहे. ऑगस्ट कोरडाच गेल्याने धान उत्पादक चिंताग्रस्त झाला होता.
हेही वाचा | ISRO : चांद्रयानवर सुरू केली प्रश्नमंजूषा – विजेत्याला मिळणार एक लाख रुपयांचे बक्षीस
पण सप्टेंबर चे पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने हलक्या प्रतीच्या गर्भार धानास पावसामुळे संजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी होऊन सध्या तरी गर्मीपासून सुटका झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
खरीप हंगामातील मुख्य पीक धान असून त्यावरच शेतकऱ्याचे अर्थकारण अवलंबून आहे. तालुक्यात बहुतांश शेतजमीन पावसाचे पाण्यावर अवलंबून असल्यामुळे कोरडवाहू आहे. यात दुर्गा, डी १००, सुमो, पाटरू, पाटील, सिंधू, १००१, २१११ ह्या हलक्या प्रतीच्या ९० ते ११० दिवसांत निघणाऱ्या धानाची लागवड शेतकऱ्यांकडून केली जाते. खरीप हंगाम २०२३ मध्ये सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिली आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण
सुरुवातीचे रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. आद्रा नक्षत्रात झालेल्या पावसाने पेरणी तर पुनर्वसु व पुष्य नक्षत्राचे पावसाने बहुतांश रोवणी आटोपण्यात आली. आश्लेषा नक्षत्रासह ऑगस्ट कोरडाच गेल्याने धान उत्पादकात चिंतेचे वातावरण पसरले होते.
हेही वाचा | शिक्षकदिनी शिक्षक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात
हलक्या प्रजातीचे धान गर्भार अवस्थेत असल्यामुळे धानाला पाण्याची आवश्यकता होती. पण उन्हामुळे धान करपण्याच्या मार्गावर होते. तर धान पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतातुर झाला होता. पण सप्टेंबर चे पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने पावसामुळे अळी काही प्रमाणात वाहून गेली. तर गर्भार धानास फायदा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पाऊस बरसला
लाखनी तालुक्यातील ५ महसूल मंडळामध्ये पोहरा ३८.६० मिलिमीटर , लाखनी २६.१० मिलिमीटर, पालांदुर ७२.७० मिलिमीटर, पिंपळगाव ४२.१० मिलिमीटर, मुरमाडी/तूप ८७.८० मिलिमीटर अशी प्रशासनाने पावसाची नोंद घेतली आहे.
या पावसाने धानास संजीवनी मिळाली असून शेतात काही प्रमाणात पाणी साचल्यामुळे खताचा उपयोग शेतकरी करणार असून हलक्या प्रजातीसह मध्यम प्रतीच्या धानासही फायदा होणार असल्याने धान उत्पादकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.