रक्षाबंधन सण अर्थातच राखी हा सण संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. भावाने बहीणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतिकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे राखीचा सण. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
राखी बांधताना बहिणीने म्हणावे – येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल॥ अर्थात ज्याप्रमाणे महान दानशूर राजा बळीने रक्षासूत्र बांधून घेवून रक्षण करण्याची हमी दिली तेच रक्षासूत्र बांधून मी माझ्या रक्षणाची हमी तुझ्याकडून घेत आहे. दानवांचे गुरू शुक्राचार्य यांनी शत्रूकडून आपल्या लोकांचे रक्षण व्हावे म्हणून राजा बळीच्या मनगटावर राखी बांधली होती. तोच हेतु लक्षात घेवून बहीण भावाच्या हाताला राखी बांधीत असते.
राखी कशी बांधावी
राखीच्या दिवशी विवाहीत बहीण आपल्या भावासाठी घरून मिठाई , राखी व नारळ इत्यादी आणते. नंतर भावाला पूर्व दिशेकडून मुख करून बसवते. भावाच्या डोक्यावर टोपी अथवा रूमाल ठेवते. पूजेच्या ताटात कुंकू , अक्षता , नारळ , राखी व मिठाई इ. वस्तू असतात. बहीण भावाला टिळा लावून त्यावर अक्षता लावते आणि भावाच्या हातात नारळ देते. नंतर उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावाला ओवाळते. त्याला मिठाई खाऊ घालते.
हेही वाचा | शाळेच्या च्या आवारातून साहित्याची चोरी
सोबतच भावाच्या प्रगती , आरोग्य आणि आनंदासाठी शुभेच्छा देते. शेवटी भाऊ बहीणीला यथाशक्ति भेटवस्तू देतो. बहीण लहान असल्यास भावाच्या पाया पडते.
राखी बांधतांना घ्यावयाची काळजी व नियम
भावाला राखी बांधतांना योग्य दिशेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. जर बहिण भावाला राखी बांधत असेल तर बहिणीने पश्चिम दिशेला तोंड करून राखी बांधावी. म्हणजेच भावाला पूर्व दिशेने चेहरा करून बसवावं. इतर दिशेला चेहरा करून राखी बांधल्यास नकारात्मक प्रभाव पडतो. राखी बांधतांना भावाला लाकडी पाटावर बसवावे आणि बहिणीने चटईवर बसून राखी बांधावी. लाल, पिवळी आणि नारंगी रंगाची राखी बांधणे शुभ ठरते.
नीळा, जांभळा, काळा आणि मरून रंगाची राखी बांधू नये. राखी बांधत असतांना आपल्या घराच्या खिडक्या उघड्या कराव्या यामुळे सकारात्मक ऊर्जेचा घरात संचार होईल आणि आरोग्यदायी वातावरण बनून राहील.भावाने बहिणीला धारदार, टोकदार, तीक्ष्ण धातू असलेल्या वस्तू भेट म्हणून देऊ नये.
हेही वाचा | मारुती व्हॅन दुचाकीची धडक, २ महिला गंभीर ; पोहरा येथील घटना
सात घोड्यांचे चित्र भेट देणे खूप शुभ मानले जाते. सात घोडे हे सूर्याचे प्रतीक मानले जाते. असे चित्र घरात ठेवल्याने उत्पन्नाचे स्रोत वाढू लागतात आणि घरात सुख-समृद्धीही वास करते.
चांदी-सोने हे ज्योतिष आणि वास्तू या दोन्हीमध्ये खूप शुभ मानले जाते, त्यामुळे जर तुम्ही चांदी किंवा सोन्यापासून बनलेली एखादी वस्तू बहिणीला अर्पण केली तर त्यांच्या समृद्धीसोबतच आरोग्यालाही फायदा होतो. मातीपासून बनवलेली कोणतीही वस्तू भेट दिल्यास बहिणीच्या सर्व कामांमध्ये यश मिळते आणि त्याचबरोबर तिच्या जीवनात सुख-शांतीही वास करते.
घरातील बहिणीला कपडे, दागिने किंवा मेकअपच्या वस्तू दिल्याने तुमच्या आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होते. नातेसंबंधांचा सुगंध कायम ठेवण्यासाठी ताजी फुले देणे खूप शुभ मानले जाते. मोराच्या पिसांनी बनवलेली कोणतीही सुंदर वस्तू भेट दिल्यास घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात आणि बहिणीच्या जीवनात यशासोबतच सुख-शांतीही प्राप्त होते.