टीम सिटी टाइम्स लाखनी | निलागोंदी येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाणाऱ्या रस्त्यांवर रोजगार हमी योजनेतून अकुशल मजूर प्रधान काम झाले. मात्र, मागील पंधरा वर्षांपासून अजूनपर्यंत एकाही पांदण रस्त्यांचे खडीकरण झाले नाही. त्यामुळे निलागोंदी येथील चारही शेती पांदण रस्ते दुर्लक्षित असून येथील शेतकऱ्यांना पावसाळ्यात आवागमन करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
निलागोंदी येथील मोरगाव (पटाची दान) पासून मारबद टोली, स्वप्नील हटवार ते यशोराज हटवार, विनोद शामकुवर, पाण्याची टाकी ते निलागोंदी पटाची दान या ठिकाणापर्यंत शेतशिवारातील चार शेती पांदण रस्ते गेल्या पंधरा वर्षांपासून रखडले आहेत. ही सर्व पांदण रस्ते खडीकरण मजबुतीकरणापासून वंचित आहेत.
पांदण रस्ते अतिशय खराब झाले आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना या रस्त्याने रहदारी करताना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. हे शेतकऱ्यांचे जुने पांदण रस्ते असून या रस्त्यांवर निलागोंदी येथील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. पावसाळ्यात पांदण रस्ते पूर्णतः दलदलीत चिखलमय असतात.
पावसाळ्यात शेतकऱ्यांना या रस्त्याने ये-जा करणे म्हणजे मरण यातना सोसण्यासारखे आहे. पावसाळ्यात बांधावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे शेतीचे कोणतेही साहित्य ने-आण करता येत नाही. शेतकरी, येणे-जाणे शेतमजूरांना चिखलातून येणे जाणे करावे लागते. शेतीसाठी रासायनिक खते व इतर साधनसामग्री नेण्याकरिता शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होतात. याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही शेतकऱ्यांसाठी साधे खडीकरण नाही.
ग्रामपंचायतच्या ठरावाकडेही पाठ
येथील 4 पांदणरस्त्याचे मातीकाम पंधरा वर्षांपूर्वी झाले. मात्र, अजूनपर्यंत खडीकरणाचा पत्ता नाही. आजपर्यंत ग्रामपंचायतीने अनेकदा ठराव घेऊन प्रशासनाला सादर केले. मात्र, शासकीय यंत्रणेने लक्ष दिले नसल्याने ग्राम समृद्धी योजनेचा बोजवारा उडाला आहे. याउलट लोकप्रतिनिधी असलेल्या गावचे पाणंद रस्ते खडीकरणासाठी मंजूर झाले आहेत. तरी लोकप्रतिनिधींनी रस्त्याचे खडीकरण करून द्यावे, अशी मागणी निलागोंदी व मोरगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
डोक्यावरून अवजड वाहतूक
आता अवजड ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती होत आहे. पण आजही या आधुनिक काळात तंत्रज्ञानच्या युगात मात्र पांदन रस्त्यांचे मजबूतीकरण व खडीकरण नसल्याने या देशाचा कणा असलेल्या कष्टकरी शेतकरी शेतमजुरांना चिखलातून जावे लागते.
ग्रामीण भागातील मोरगाव, राजेगाव, मुंडीपार, शिंदीपार, सालेभाटा, गुढरी, चिकगाव या परिसरातील नागरिक मोरगाव पटाची दान ते मारबद टोली याच मार्गाने ये-जा करण्याकरीता सरळ मार्ग म्हणून उन्हाळ्यात येजा करीत असतात. पावसाळा लागला की, साथी सायकलसुद्धा पांदण रस्त्यावर चिखल झाल्याने बांधापर्यंत जात नाही. खताच्या गोणीचं ओझे शेतकऱ्यांना डोक्यावर व खांद्यावर वाहून न्यावे लागते. गुडघाभर पाण्यातून चिखल तुडवित, सरपटणाऱ्या विषारी जीवांचे भय उराशी घेऊन शेतकरी जीव मुठीत घेऊन आवागमन करतात.
शेतकऱ्यांना मनस्ताप
शेतकऱ्यांचे आवागमन सुरळीत व्हावे. शेतमाल आणण्याची सुविधा सोयीची व्हावी यासाठी पांदण रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करणे हा मातोश्री पांदण रस्ते योजनेचा उद्देश आहे. मात्र, निलागोंदी येथील चार शेती पांदन रस्ते दुर्लक्षित असून येथील शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पंधरा वर्षांपासून खडीकरण व मजबूतीकरणापासून वंचित आहेत. शेतकरी शेतमजुरांना चिखल आणि दलदलीची वाट तुडवित जावे लागते. पावसाळ्यात काही पांदण रस्त्यांना डबक्याचे तर काही ठिकाणी चिखल साचून दलदल निर्माण होते. मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे शेतीचे कोणतेही साहित्य ने-आण करता येत नाही. मातीकाम होऊन पंधरा वर्षे लोटेले तरी खडीकरण होऊ शकले नाही