प्रजासत्ताक भारतात हिंदू कोड बिल कायदा पास व्हावा यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. केंद्रातील पं.नेहरू सरकारने स्त्रीयांना समानतेचा अधिकार देणारा व सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार असलेला हिंदू कोड बील कायदा पास केला व इथूनच प्रजासत्ताक भारतात महीला सशक्तीकरणाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली.
उच्चवर्णीय समाजातील स्त्रीयांबरोबरच दलीत म्हणून गणल्या गेलेल्या स्त्रीशक्तीनेही आपल्या बुद्धीमत्तेची झलक दाखवून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले. अशा मोजक्या दलीत स्रीयांपैकी एक वीरांगना स्त्रीशक्ती ज्या स्त्रीशक्तीने आपल्या चातुर्याने देशाच्या राजकारणात अमीट छाप पाडली आहे. त्या महान स्त्रीशक्तीचे नाव आहे बसपा सुप्रीमो बहन मायावती.
आज १५ जानेवारी २०२४ बहन मायावती यांचा ६८ वा वाढदिवस. एका दलीत आईबापाच्या पोटी जन्मलेल्या या भगीनेने आपल्या अचाट बुद्धीमत्तेने व राजकीय कौशल्याने उत्तरप्रदेश सारख्या देशातील मोठया राज्यात चारदा मुख्यमंत्री पद भुषवीले.
शिक्षिका म्हणून केले होते कार्य
बहन मायावती यांचा जन्म नवी दिल्लीतील श्रीमती सुचेता कृपलानी दवाखान्यात झाला. तिचे वडील प्रभु दास हे चमार जातीचे असून टपाल खात्यात कर्मचारी होते. त्या काळी मुलींना मुलांपेक्षा कमी लेखले जायचे.
त्यामुळे वडीलाने मायावतीला कमी दर्जा असलेल्या सरकारी शाळेत घातले. मायावतीने आपले प्राथमिक , माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण पूर्ण करून सन १९७५ मध्ये दिल्ली विदयापिठातून बी.ए ची पदवी प्राप्त केली.
सन १९८३ मध्ये एल.एल.बी पदवी प्राप्त करून बी.एड पूर्ण केले. मायावतीने दिल्लीतील इंदपुरी जेजे कॉलनी येथे शिक्षिका म्हणून कार्य करीत भारतीय प्रशासकीय सेवेच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही केला. परंतु निसर्गाला काही वेगळेच मान्य होते.
अशी झाली होती राजकारणाची सुरुवात
मायावतीने दिल्लीच्या एका कार्यक्रमात प्रभावी भाषण दिले. मायावतीच्या भाषणाची चर्चा बामसेफचे सर्वेसर्वा मान्यवर कांशीराम यांच्यापर्यंत पोहचली. कांशीरामजींनी वेळ न दवडता मायावतीचे घर गाठले व तिला बामसेफमध्ये येण्याची सूचना केली. त्यांनी तिला म्हटले की , ” मी तुला असा नेता बनवीन की प्रशासकीय अधिकारीही तुला वंदन करतील.
मायावतीच्या वडीलाने या गोष्टीला विरोध केला परंतु मायावतीच्या मनात जनसेवेचे स्फुल्लींग पेटले होते. तिने आपल्या शिक्षकी पेशातील जमवलेली जमापूंजी घेवून मान्यवर कांशीरामजी सोबत बहुजन चळवळीसाठी स्वताःला समर्पीत केले
इथूनच मायावतीच्या जीवनातील नवीन आध्यायाला सुरूवात झाली व मायावती प्रभु दास ही अनुसूचीत जातीतील चामार जातीची महीला करोडो बहुजनांची , दलीतांची, वंचीतांची बहीण बहन कुमारी मायावती बनली.
मायावती सण १९८९ साली बनले प्रथम खासदार
मान्यवर कांशीरामजींनी सन १९८४ मध्ये बामसेफ चळवळीला कायम ठेवीत देशाच्या राजकारणात आपली पकड मजबूत करण्यासाठी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. याच बहुजन समाज पक्षातर्फे बहन कुमारी मायावतीजी सन १९८९ मध्ये संसदेत खासदार म्हणून निवडून गेल्या.
मान्यवर कांशीरामजींनी सन २००१ मध्ये लखनऊच्या सभेत आपला उत्तराधिकारी म्हणून मायावतीला घोषित केले व १८ सप्टेंबर २००३ रोजी बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बहनजीची निवड झाली.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रभावाखाली कार्य करून बहन कुमारी मायावतीने अनुसूचीत जाती-जमाती , वंचीत घटकातील तसेच उच्चवर्णीयांमधील कमजोर घटकांची परीस्थीती सुधारण्यासाठी युद्धपातळीवर कार्य सुरू केले.
दलित घटकांची लाखो लोक बहीण म्हणून संबोधतात
भारतातील आरक्षण ही एक अशी व्यवस्था आहे ज्याद्वारे विद्यापीठांमधील सरकारी पदे आणि जागा काही टक्के मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती आणि जमातींच्या व्यक्तींसाठी राखीव असतात.
त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत, मायावतींनी मागासवर्गीयांसाठी सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांमध्ये आरक्षणाचे समर्थन केले, कोट्यात वाढ केली आणि धार्मिक अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत उच्च जाती यासारख्या अधिक समुदायांचा समावेश केला.
मायावती यांच्या कारकिर्दीला भारताचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांनी “लोकशाहीचा चमत्कार” म्हटले आहे . लाखो दलित समर्थक तिला एक प्रतीक म्हणून पाहतात आणि तिला “बहनजी” (बहीण) म्हणून सन्मानाने संबोधतात.
विरोधी पक्षांकडूनही मिळवली प्रशंसा
बहन मायावती सन १९९४ मध्ये उत्तरप्रदेशातून पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेल्या. सन १९९५ मध्ये त्या उत्तरप्रदेशच्या पहील्या दलीत मुख्यमंत्री बनल्या व यानंतर तिने कधीही मागे पाहीले नाही. बहन मायावती यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात भ्रष्टाचार , खंडणी , गुंडगीरी , महीलांवरील बलात्कार , दलीत उत्पीडन इ. मध्ये कमालीची घसरण आली होती.
राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मायावतींनी कार्यक्षम प्रशासन , कायदा व सुव्यवस्थेला चालना दिली. आपल्या प्रामाणिक व जनकल्याणकारी कार्यांद्वारे मायावतींनी आपल्या विरोधी पक्षांकडूनही प्रशंसा मिळविली.
सन २००७ मध्ये, तिच्याच राजकीय पक्षाचे खासदार उमाकांत यादव , जमीन बळकावण्याच्या प्रकरणात आरोपी होते. त्याची बाजू न घेता मायावतींच्या आदेशानुसार त्याच्या घराजवळून त्याला अटक करण्यात आली.
गाठले होते १७ टक्के उच्च जीडीपी विकास दर
सप्टेंबर-ऑक्टोबर २०१० दरम्यान अयोध्या निकालाच्या वेळी मायावती सरकारने कायदा व सुव्यवस्था राखली त्यामुळे राज्यात शांतता होती. तिच्या कार्यकाळात अनेक हाय-प्रोफाइल गुन्हेगार आणि माफिया डॉन यांना तुरुंगात टाकण्यात आले. तिने बलात्कारविरोधी मजबूत कायद्यांची मागणी केली. मागील किंवा त्यानंतरच्या सरकारच्या तुलनेत मायावतींच्या कार्यकाळात कमी दंगली, सर्वात कमी बलात्कार आणि कमीत कमी भ्रष्टाचार घडले.
बहनजीच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशने १७ टक्के उच्च जीडीपी विकास दर गाठला. बहन मायावती यांचा कार्यकाळ हा रयतेचा काळ होता. बहनजी ही प्रजेची राणी (मुख्यमंत्री) कमी पण ” माय ” जास्त होती. ज्या स्त्रीशक्तीने आपल्या लेकरासमान प्रजेला मायेची सावली देत सुखसंपन्न जीवन बहाल केले.
आजघडीला देशात जी अराजकता व बेबंदशाही माजलेली आहे. ज्या पद्धतीने संवैधानिक मुल्यांचे अवमुल्यन होत आहे ते पाहता भारतीय जनता पुनश्च भांडवलवादाच्या गुलामीत तर जाणार नाही अशी शंका निर्माण होत आहे. परंतु महापुरूषांनी आपल्या जीवाचे बलीदान देत महत्प्रयासाने उभा केलेला हा लोकशाहीचा डोलारा बहन कुमारी मायावती एवढया लवकर उद्ध्वस्त होवू देणार नाही.
बहनजीशिवाय या देशाचे सत्ताकारण अपूर्ण आहे.
सन २०२४ मध्ये बहनजी या प्रजासत्ताक भारताचे पहील्या दलीत प्रधानमंत्री बनून सर्व बहुजनांचा , दलीतांचा व वंचितांचा उद्धार करतील ही आस मनी बाळगून मी पुनश्च बहनजी यांना वाढदिवसाच्या मंगलकामना करतो.
लेखक – रोशन खोब्रागडे
( के. रोशनलाल )