अतुल नागदेवे लाखनी | राज्य विधानसभेच्या निवडणूका आता दृष्टीक्षेपात येऊ लागल्या आहेत. येत्या दीड-दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणूकांचे बिगूल वाजेल, अशी चर्चा होत आहे. त्यामुळे सर्वच विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघ देखील चर्चेत असणारा मतदारसंघ आहे.
याठिकाणी सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमदार आहेत. तरीही भाजपातील स्थानिक नेत्यांकडून विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. साकोली मतदारसंघात सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे जोरदार वाहत आहेत. अनेक नावांची चर्चा भावी आमदार म्हणून राजकीय वर्तुळात तसेच खेडोपाडी होत आहे.
या पार्श्वभूमीवर सध्याची मतदारसंघात असलेली राजकीय परिस्थिती आणि पक्षीय राजकारणाचा घेतलेला हा आढावा पडद्यामागून सक्रीय अनेक ‘भावी आमदार’ मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार नाना पटोले हे पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात असतील, अशी चर्चा आहे.
सोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे, माजी जि. प. अध्यक्ष वसंत एंचीलवार, भाजपाचे माजी आमदार राजेश (बाळा) काशीवार सोमदत्त करंजेकार, डॉ. विजया नंदूरकर यांची चर्चा सर्वाधिक आहे. तर आयत्यावेळी काही इच्छुकांची नावे समोर येऊ शकतात, पण ते सध्या पडद्यामागून तयारी करत असल्याची चर्चा होत आहे. सध्या तरी मतदारसंघात दुरंगी लढत होइल, असे चित्र आहे.
नेत्यांसाठी कार्यकर्ते झाले सोशल मीडियावर एक्टिव्ह
राज्यात सध्या शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची महायुत्ती असून तिन्ही पक्ष महायुती म्हणून सत्तेत आहेत. तसेच आगामी विधानसभा तिन्ही पक्ष एकत्रित महायुती म्हणून लढविणार असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरीही साकोली मतदारसंघात महायुतीत आलबेल असल्याचे दिसत नाही.
तिन्ही घटक पक्षांतील स्थानिक नेत्यांत सतत खटके उडत आहेत. यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून घटक पक्षातील नेते हेही त्यांच्या परीने तयारीत गुंतले आहेत.विधानसभा निवडणूकीसाठी हातात कमी कालावधी शिल्लक असल्याने लोकांना आवडतील, भावतील असे उपक्रम राबविण्यावर सध्या इच्छुकांचा जोर आहे. तर कार्यकर्ते देखील दादा, भाऊ यांच्यासाठी सोशल मीडियावर एक्टिव्ह झालेत.
यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीनंतर मतदारसंघांचा आमदार कोण असेल? हे आज सांगणे शक्य नाही. मात्र, तिकीट वाटपानंतर बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल असे बोलले जात आहे. जागा बळकट करण्यात नेते व्यस्त विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे साकोली मतदारसंघातील नेते मंडळींची चांगलीच धावपळ होताना दिसत आहे. प्रत्येक नेत्याने आपला मोर्चा संध्या गावभेट दौऱ्याकडे वळविल्याचे दिसत आहे.
गावागावात’ नेत्यांची नजर पक्ष बांधणीकडे
गावागावात जाऊन पक्षाची धोरणे आणि आपले विचार मांडून विकासाच्या चर्चा करताना नेते मंडळी व्यस्त झालेत. पक्ष बांधणीसह आपली जागा आणि इमेज भक्कम करण्यात सर्वच भावी आमदार व्यस्त असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात दिसत आहे.
के सिरीजचाच, बोलबाला १९६७ पासून साकोली विधानसभेत भाजपाने पाच वेळा आपला उमेदवार आमदार म्हणून निवडून आणला आहे. विशेष म्हणजे यात चारवेळा कोहळी समाजाचा उमेदवार भाजपाचा आमदार झाला आहे. यावर्षीच्या निवडणुकीत जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे व माजी आमदार बाळा काशीवार हे कोहळी समाजाचे असले तरी भाजपा उमेदवारीची माळ जिल्हाध्यक्ष यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपाकडून इच्छूक असलेले वसंत एंचिलवार अलपसंख्याक, सोमदत्त करंजेकार तेली व डॉ. विजया नंदूरकर माळी समाजाचे आहेत. त्यामुळे साकोली विधानसभेचा पूर्व इतिहास पाहाता माजी पालकमंत्री यांचे विश्वासू कोहळी समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे यांनाच भाजपाची उमेदवारी देण्याची मागणी सर्व कार्यकर्त्यांकडून होत असल्याची चर्चा क्षेत्रात आहे.