अतुल नागदेवे लाखनी | विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांत प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. भाताच्या कमी उत्पादकतेच्या विविध कारणांपैकी या पिकावर येणाऱ्या किडी हे एक मुख्य कारण आहे. भात पिकावर रोपवाटिकेपासून भातकापणीपर्यंत विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो. पूर्व विदर्भात भात पिकाला दुसरा पर्याय नसल्यामुळे पीक फेरपालट होत नाही.
अनेक वेळा पाण्याची सोय असल्यामुळे उन्हाळी भाताचेही उत्पादन घेतले जात असल्याने किडीसाठी पर्यायी खाद्य उपलब्ध होते. परिसरातील अन्य वनस्पतींवर किडींच्या असंख्य पिढ्या अखंड उपजीविका करत असतात. खोडकिडा ही यातील एक मुख्य कीड असून, तिचे वेळीच नियंत्रण केले पाहिजे.
खोडकिडा या किडीचा पतंग १ ते २ से.मी. लांब, समोरील पंख पिवळे व मागील पांढरे असे असतात. मादी पतंगाच्या पंखाच्या खालील भागावर काळसर ठिपका असतो; तर नर पतंगाच्या पंखावर काळसर ठिपका नसतो.
नुकसानीचा प्रकार
सुरवातीच्या काळात अळी कोवळ्या पानांवर उपजीविका करून नंतर खोडात प्रवेश करते. आतील भाग पोखरून खाते. परिणामी, फुटवा सुटण्यास सुरवात होतेवेळी रोपाचा गाभा मरतो. यालाच ‘डेट हर्ट’ किंवा ‘कीडग्रस्त फुटवा’ असे म्हणतात. या रोपाचा फुटवा ओढल्यास सहजासहजी निघून येतो. पीक तयार होण्याच्या वेळी खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्या बाहेर पडतात. या लोंब्यांना विदर्भामध्ये ‘पांढरी पिशी’ असे म्हणतात.
एकात्मिक पद्धतीने नियंत्रण
भात रोवणी करीता पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. २ ते ३ मीटर नंतर ४५-६० सेमी चा पट्टा सोडावा. जर अगोदरच रोवणी झाली असेल तर पट्टा पाडण्याकरिता दोरी लावून पट्टा काढावा / रोपे उपटून टाकावी.
पट्टा पद्धतीने रोवणी केल्यास शेतामध्ये सूर्य प्रकाश व हवा खेळती राहते व शेतामध्ये निरीक्षणाकरीता आणि फवारणी करीता सोयीचे होते.
खोडकिडीचा पतंग पानाच्या शेंड्यावर अंडी देते त्यामुळे रोवणीआधी रोपांची शेंडे कापून घेणे व रोपांची मुळे क्लोरोपायरीफोस २०% ईसी १० मिलि युरिया २०० ग्राम १० ली. पाण्यात मिसळून ३ तास त्या पाण्यात बुडवून ठेवणे व नंतर रोवणी करणे.
दाणेदार किटकनाशके जसे क्लोरानट्रानीलीप्रोल ०.४%, कारटॉप हायड्रोक्लोराईड ४ जी किंवा कार्बोफुरोन ३% २५० ग्राम प्रती १०० चौमी रोपवाटिकेमध्ये टाकून ठेवून पाच दिवसानंतर रोपांची रोवणी करावी.
रोवणी नंतर १५ ते २० दिवसांनी शेतामध्ये ट्रायकोकार्ड एकरी २ कार्ड या प्रमाणात वापरून दर ८ ते १० दिवसांच्या अंतराने ४ ते ५ वेळा कार्ड जैविक नियंत्रणाकरीता सोडावे.
एकरी ६ या प्रमाणात कामगंध सापळे लावावे व दर ३० दिवसानंतर सापळ्यातील लूर (स्कीरपोलूर) बदलवावा. शेतामध्ये एकरी १० पक्षीथांबे (स्थानिक काठ्यांचे) लावावे.
शेतात १०% किडग्रस्त फुटवे दिसताच क्लोरानट्रानीलीप्रोल ०.४ % दाणेदार १० किग्रा. किंवा कारटॉप हायड्रोक्लोराईड ४ जी २५ किग्रा. किंवा फिफ्रोनील ०.३ जी २५ किग्रा. प्रती हेक्टर बांधीमध्ये पाणी असताना टाकावे किंवा क्लोरानट्रानीलीप्रोल १८.५ % एस.सी. 3 मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
किशोर गो. पात्रीकर
उपविभागीय कृषी अधिकारी, साकोली