टीम सिटी टाइम्स लाखनी | नागपूरवरून बालाघाटकडे मोटारसायकलने जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६ वरील मानेगाव/ सडक येथे महामार्गावरून जाणाऱ्या पाळीव जनावरांना वाचविण्याचे प्रयत्नात गुराख्यास मोटारसायकलने धडक दिल्याची घटना शुक्रवारी (ता १५) सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली.
मानेगाव /सडक राष्ट्रीय महामार्गावरील घटना
यात ४ जन जखमी झाले असून जखमींत ३ वर्षीय बालिकेचा समावेश आहे. जखमींची नावे पतिराम नेवरे(६५) मानेगाव/ सडक , तालुका लाखनी ,
सुरेश नागपुरे (४२) , श्यामली सुरेश नागपुरे (३५) , अन्वी सुरेश नागपुरे (३) रा. बालाघाट (मध्यप्रदेश) असे आहेत. सिटी टाइम्सचे पत्रकारांनी जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळवून दिल्याने प्राण वाचल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
चार जखमींत ३ वर्षीय बालिकेचा समावेश
नागपुरे कुटुंबीय नातेवाईकांना भेटण्यासाठी सिल्व्हर रंगाच्या होंडा कंपनीचे मोटारसायकलने नागपूरला गेले होते. परतीचे प्रवासात बालाघाट (म.प्र.) कडे जात असताना शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजता दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६
वरील मानेगाव / सडक येथे पाळीव जनावरांना वाचविण्याचे प्रयत्नात तोल जाऊन गुराख्यास धडक दिल्याने मोटारसायकलवरून महामार्गावर पडून नागपुरे कुटुंबीय जखमी झाले.
अपघातस्थळी सिटी टाइम्सचे पत्रकार नेहाल कांबळे , सचिन रामटेके , धनंजय लोहबरे , अतुल नागदेवे , माजी सरपंच भांडारकर , सामाजिक कार्यकर्ता गोपाल पिंपळशेंडे , सुरेश पिंपळशेंडे यांनी १०८ आणि ११२ क्रमांकावर भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला पण प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे लाखनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली.
पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार सुरेश सिडाम, पोलिस अमलदार ऋषी कऱ्हाडे घटनास्थळी आले. सिटी टाइम्सच्या पत्रकारांच्या मदतीने पोलिस गाडीने जखमी नागपुरे कुटुंबीय व गुराख्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नेण्यात आले . जखमींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले .
सिटी टाइम्सच्या पत्रकारांच्या प्रयत्न व सहकार्याने जखमींना वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे . वृत्त लीहिपर्यंत लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल करणे सुरू होते.