टीम सिटी टाइम्स भंडारा | विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागण्याचे मार्गावर असताना भारतीय जनता पार्टी तिकीट इच्छुकांच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्याचे चित्र साकोली विधानसभा (Sakoli Vidhansabha ) क्षेत्रात दिसून येत आहे. त्यात उच्च विद्या विभूषित उमेदवारांची संख्या अधिक असून ३ डॉक्टर तर ३ स्नातकांचा समावेश आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून मात्र विद्यमान आमदार तथा काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे एकमेव उमेदवार असल्याने भारतीय जनता पक्ष कोणाचे नावावर शिक्कामोर्तब करतो. याकडे मतदारांचे लक्ष लागले असले तरी बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे महायुती व महाविकास आघाडीची नजर असल्याचे बोलले जाते.
सण २००८ मध्ये लोकसभा व विधानसभा क्षेत्र पुनररचना झाली. त्यात लोकसंख्येच्या कारणावरून जिल्ह्यातील लाखांदूर व अड्याळ विधानसभा क्षेत्र गोठविण्यात आले. तर भंडारा, साकोली व तुमसर हे ३ विधानसभा क्षेत्र कायम आहेत.
सण २००९ साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नाना पटोले यांनी काँग्रेस चे उमदेवार सेवक वाघाये यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा चे राजेश काशीवार यांनी काँग्रेस चे सेवक वाघाये यांनी पराभव केला होता.
तर २०१९ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपा चे डॉ. परिणय फुके यांचा पराभव केला होता. परिसीमन नंतर साकोली विधानसभा क्षेत्रावर भाजपा चे प्राबल्य असल्याचे निवडणूक निकालावरून दिसून येते.
विधानसभेचा कार्यकाल २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत असल्यामुळे मतदार विषयक सर्व प्रक्रिया प्रशासनाने आटोपली असली तरी पावसाळा व सणासुदीचे दिवस असल्यामुळे मुदतीत निवडणूक प्रक्रिया पार पडेल की राष्ट्रपती शासन लावण्यात येईल हे कळण्यास मार्ग नसला तरी भारतीय जनता पार्टी कडून विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके, वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा सचिव डॉ. विजया ठाकरे नंदुरकर या शिवाय माजी
आमदार राजेश काशीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर बावनकर हे तिकिटासाठी इच्छुक असून वरील सर्वच उमेदवार उच्च विद्या विभूषित आहेत. त्या मानाने काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान आमदार नाना पटोले हे एकमेव इच्छुक असल्याने काँग्रेसपेक्षा भाजपात विधानसभा तिकीट इच्छुकांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.
सध्या राज्यात भारतीय जनता पार्टी-शिवसेना (शिंदे गट)- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती सत्तेत आहे. तर काँग्रेस-शिवसेना (उद्धव ठाकरे गट) -राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची महाविकास आघाडी विरोधी पक्षात आहे.
साकोली विधानसभा क्षेत्रात महायुतीचा घटकपक्ष असलेल्या भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जनाधार असल्यामुळे महाविकास आघाडीची जागा काँग्रेस ला निश्चित असली तरी महायुतीतून भाजपा की अजित पवार गट हा गुंता अजून कायम असला तरी विधानसभा तिकीट इच्छुकांची संख्या भाजपात अधिक असल्याचे दिसून येते.
भारतीय जनता पार्टी कडून तिकीटाची मागणी केलेले डॉ. परिणय फुके हे पीएचडी तर डॉ. सोमदत्त करंजेकर हेही पीएचडी असून डॉ. विजया ठाकरे नंदुरकर ह्या बीएएमएस आणि राजेश काशीवार हे बीएससी (जीवशास्त्र), प्रकाश बाळबुद्धे एमएससी (कृषी) तसेच पद्माकर बावनकर यांची शैक्षणिक पात्रता बीकॉम असल्याने सर्वच उच्च विद्या विभूषित उमेदवार तिकीट इच्छुक आहेत.
जातीय समीकरणाचा विचार करून राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष लोकसभा अथवा विधानसभेचे तिकीट देत असतात. (Sakoli Vidhansabha) साकोली विधानसभा क्षेत्रात कुणबी, अनुसूचित जाती, तेली, कोहळी, माळी या समाजाचे प्राबल्य असून काँग्रेसचे एकमेव इच्छुक प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole) हे कुणबी समाजाचे तर भारतीय जनता पक्षाकडून
डॉ. परिणय फुके (Parinay Fuke) कुणबी, डॉ. सोमदत्त करंजेकर व पद्माकर बावनकर तेली, राजेश काशीवार व प्रकाश बाळबुद्धे कोहळी, तर विजया ठाकरे नंदूरकर ह्या माहेरघरील कुणबी,व पतीघरील माळी समाजाच्या आहेत. (Sakoli Vidhansabha) साकोली विधानसभा क्षेत्राचा इतिहास पाहिल्यास कुणबी व कोहळी समाजाने या क्षेत्राचे प्रतिनीधित्व केले आहे.
तेली समाज (BJP) भारतीय जनता पार्टीच्या कट्टर समर्थक असला तरी या समाजास भाजपाकडून तिकीट दिले गेले नाही. हाच प्रकार माळी समाजाच्या बाबतीतही आहे. तसेच महिलांना प्रतिनिधीत्वाची संधीच दिली गेली नाही यावरून भाजपा तिकीट कोणाला देते. यावर सर्वकाही अवलंबून असल्याच्या साकोली विधानसभा क्षेत्रात चर्चा होत असल्या तरी बहुजन समाज पार्टी तथा वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असेल याकडे महाविकास आघाडी व महायुतीचे लक्ष लागले आहे.