टीम सिटी टाइम्स लाखनी | लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने मी खचणार नाही, कोणाला वाटत असेल, सेवक वाघाये संपले; पण मी संपणारा नाही. आता संपूर्ण जिल्हाभर संघटन बांधणी करून मजबूतीने भर देणार आहे, असे प्रतिपादन माजी आमदार सेवक वाघाये यांनी केले आहे.
साकोली विधानसभा क्षेत्राचे दोनदा आमदार राहीलेले सेवक वाघाये हे आपल्या फटकळ शैलीने सर्वांना परीचीत आहेत. सेवकभाऊने आपल्या राजकीय कारकिर्दीत लाखनी, साकोली, लाखांदूर तालुक्यात अनेक महत्वाची विकासकामे केली. त्या काळात सेवकभाऊंचा शासनदरबारी वचक होता. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी त्यांना वचकून असायचे. सेवकभाऊंना परीसरात ढाण्या वाघ म्हणून संबोधले जात होते.
अलीकडेच म्हणजे, ४ जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चांगली कामगीरी केली. भंडारा- गोंदीया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.प्रशांत पडोळे यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना पराभूत केले.
या निवडणुकीच्या रणसंग्रामात सेवकभाऊ वाघाये यांनीही उडी घेतली होती. परंतु यावेळेस जनतेने त्यांना नाकारले. कारण यावेळी दलीत मतदार हा विभागला गेला नाही. संविधान धोक्यात असल्याची बतावणी करुन काँग्रेस पक्षाने दलीतांची एक गठ्ठा मते आपल्याकडे खेचली. आंबेडकरी विचारधारा असलेले पक्ष वंचीत व बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनाही वीस ते तीस हजारांच्या दरम्यानच रहावे लागले.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी आमदार सेवकभाऊ वाघाये यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की , मी पराभूत झालो असलो तरी माझी विजयाची जिद्द अजूनही कायम आहे. यावरून येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत हा ढाण्या वाघ पुनश्च पुनरागमन करील हे यावरून दिसून येत आहे.
सेवकभाऊंचा त्यांच्या विधानसभा क्षेत्रात चाहतावर्ग मोठा आहे. सेवकभाऊ हे सुरूवातीला काँग्रेस पक्षाचे अधिकृत सदस्य होते परंतु त्यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षाने त्यांना घरचा अहेर दिला परंतु काँग्रेसविषयी सेवकभाऊंच्या मनात अजूनही आदर आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे अधिकृतपणे उमेदवारी मिळेल या आशेपोटी सेवकभाऊंनी मुंबई-दिल्लीची फेरी केली. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबतही उमेदवारीबाबत विचारणा केली.परंतु तिकीटवाटपाचा विषय हा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाकडे असल्यामुळे सेवकभाऊचा गणीत जुळू शकला नाही. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा ढाण्या वाघ कंबर कसणार हे निश्चितच समजावे लागेल.