टीम सिटी टाइम्स लाखनी : गेल्या काही दिवसापासून लाखनी शहर व परिसरात रात्रीच्या सुमारास बोचरी थंडी पडू लागली आहे. सध्या दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असे संमिश्र वातावरण सध्या तयार झाले आहे. या लगेच बदलणाऱ्या वातावरणामुळे प्रत्येक घरातील किमान एक-दोघे तरी आजारी पडत असल्याचे चित्र लाखनी शहरासह ग्रामीण परिसरात आहे.
लाखनी तालुक्यासह जिल्ह्यात कमाल व किमान तापमानात मोठा फरक पडत आहे. बदलत्या तापमानामुळे दिवसा कडक ऊन, उन्हाचा चटका आणि रात्री गुलाबी थंडी पडत आहे. या संमिश्र वातावरणामुळे अनेकांना सर्दी, पडसे, खोकले, अंगदुखी, चक्कर येणे यासारखे विकार उद्भवू लागले आहेत.
लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयातील सर्दी-ताप-खोकला आजाराच्या ओपीडीत वाढ झाली आहे. नेहमी 40 ते 50 रुग्ण असताना सध्याच्या वातावरणात हा आकडा 70 च्या वर पोहोचला आहे. सकाळी, रात्री थंडी तर दुपारी ऊन पडत आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. याचाच परिणाम म्हणून, लहानांपासून वृद्धांपर्यंत व्यक्तींना सर्दी, ताप आणि खोकला यासारखे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात रुग्ण संख्या वाढली आहे.
हे टाळा
उघड्यावरीलखाद्य पदार्थ खाणे टाळा
फ्रीजमधीलखाद्य पदार्थ खाऊ नका
हवेतप्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याने लहान मुलांना सायंकाळी बाहेर काढू नका.
तापाकडे दुर्लक्ष करू नका
दोन दिवसांच्या तापाकडे दुर्लक्ष करू नका. वातावरण बदलाने बालदमा, डेंग्यू, निमोनियाचा धोका वाढला आहे. मच्छरदाणीचा वापर करा. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा.
सध्याचे वातावरण हे दुपारी गरम आणि रात्री थंड असे आहे. या दोन्ही तापमानात शरीर अनुकूल व्हायला वेळ लागतो. त्यामुळे शरीराला योग्य समतोल साधता येत नाही. याचा परिणाम म्हणून सर्दी, खोकला, ताप, राहणारच, अस्थमा आदी आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
-डॉ चंद्रकांत निंबार्ते , लाखनी