अतुल नागदेवे भंडारा | सर्वसामान्यांचा आवाज शासन दरबारी उठविण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला घटनेने दिले आहे.शासन व्यवस्थेतील कणा असलेली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत. मात्र,तब्बल अकरा दिवसापासून म्हणजे १६ ऑगस्टपासून जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायती त्या गावच्या सरपंचांनी स्वतः कुलूपबंद केल्या असल्याचे चित्र आहे.
असेच एखाद्या ग्रामस्थाने ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले तर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून त्या ग्रामस्थावर गुन्हा दाखल केला जातो. मग जिल्ह्यातील गावागावातील सरपंचांनी ग्रामपंचायतीला आपली खाजगी मालमत्ता समजून कुलूपबंद केले. तर शासकीय कामात अडथळा आणला,या कारणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये? असा प्रश्न आता जिल्ह्यातील ग्रामस्थांना पडला आहेत.
भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथील महिला सरपंचांना या संबंधात विचारणा केली असता महिला सरपंचाना बरोबर उत्तरे देता आली नाहीत.तर महिला सरपंचाच्या पतींने याबद्दल अवगत केले. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीला कुलूप कोणी लावले? कुलूप नवीन लावले की जूनेच? कुलूप नेहमीकरीता सरपंचच लावत असतो का? कुलूप सरपंचाने लावले मग ग्रामपंचायत सदस्यांना व ग्रामस्थांना या आंदोलनाबाबत माहिती देऊन विश्वासात घेतले का?
कुलूप लावल्यानंतर चावी कुणाकडे दिली? असे अनेक प्रश्न प्रतिनिधीने विचारले असता महिला सरपंच महोदयांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत. गावातील कोणतीही विकासकामे ग्रामस्थांना,सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने करणारे सरपंच गावहिताचा बागूलबुवा करीत आता या आंदोलनाच्या माध्यमातून स्वतः ची पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
सरपंचांच्या एकाधिकारशाहीचा उदय?
”ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करुनी म्हणती साधू ॥ अंगा लावूनिया राख । डोळे झाकुनी करती पाप ॥” जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी भोंदूगिरीवर चारशे वर्षांपूर्वी अशा शब्दात प्रहार केला होता.
अशा ‘भोंदूगिरी’ च्या अवलादी आजही पुन्हा पुन्हा अवतरीत होत आहेत.अशी मंडळी राजकारणामध्ये आपली कला अन् लीला दाखवत आहेत.सत्य चप्पल घालून घरातून बाहेर पडेपर्यंत खोटे गावभर फिरून आलेले असते असे म्हटले जाते.
याचा विचार करता गावच्या राजकारणामध्ये गावहिताला तिलांजली देऊन व ग्रामस्थांना वेठिस धरून तसेच गावातील सदस्यांना कवडीची किंमत नाही असे समजून थेट जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंच महोदयांनी गावात आपल्या एकाधिकारशाहीचा वापर करत असल्याचे चित्र अनेक गावात यानिमित्ताने दिसून येत आहे.
खर काय अन् खोट काय ?
लाखनी तालुक्यात एकूण ७१ ग्रामपंचायची आहेत. विशेष म्हणजे सरपंच संघटनेचा जिल्हाध्यक्ष हा तालुक्यातील एका गावचा सरपंच असून जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायचीच्या सरपंचांनी आपआपल्या गावातील पंचायतींना कुलूप ठोकून चाव्या विस्तार अधिकाऱ्याकडे जमा केल्या असल्याच्या बातम्या अनेक प्रसार माध्यमातुन प्रसिध्द करण्यात आल्या.
मात्र,ही सत्य परिस्थिती जाणून घेतली असता लाखनी तालुक्यातील फक्त ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आपल्या गावच्या पंचायतींना कुलूपबंद करत चाव्या विस्तार अधिकाऱ्याकडे दिल्या असल्याचे सत्य समजले. यावरुन या आंदोलनाला काही गावच्या सरपंचानी पाठ दाखविल्याचीही चर्चा देखील आहे. त्यामुळे खर काय अन् खोटे काय या विंवचनेत सरपंच असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
सरपंच व ग्रामसेवक याबद्दल गावकरी सांशक
ग्रामपंचायतीच्या चाव्या कायदेशीरपणे ग्रामपंचायतीच्या सचिवाकडे असतात.मग सचिवाने सरपंच महोदयाला ग्रामपंचायतीच्या चाव्या दिल्या कशा?जर सरपंच महोदयांनी नवीन कुलूप आणून पंचायतीला कुलूप ठोकला तर सचिवाने याची रितसर तक्रार नजीकच्या पोलिस ठाणे व आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली का?व केली असल्यास संबंधितांनी याची दखल घेत कारवाई का केली नाही? असे नानाविध प्रश्न आता गावकरी उपस्थित करीत आहेत.
लाखनी येथील पंचायत विभागात एकूण ७१ ग्रामपंचायत असून, त्यापैकी ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी चाव्या जमा केले आहेत. गाव निहाय माहिती देता येणार नाही.
प्रदीप लांजेवार, विस्तार अधिकारी,
पंचायत समिती,लाखनी
गावातील ग्रामपंचायत कुलूप बंद असल्यामुळे शासकीय कामाकरिता विद्यार्थ्यांना दाखले मिळत नसल्याने मोठा मनस्ताप सहन कराव लागत आहे.
श्रीकांत नागदेवे, सामाजिक कार्यकर्ता, सोमलवाडा
ग्रामपंचायतीला कुलूप बंद आंदोलनाची माहिती संपूर्ण सदस्यांसह गावकऱ्यांना देण्यात आली होती.दरम्यान,कुलूपबंद करून पंचायत विभागात चावी सोपविण्यात आली.
सुरज निखाडे, सरपंच ग्रा.पं.सेलोटी