टीम सिटी टाइम्स लाखनी | तालुक्यातील सावरी/मुरमाडी येथील जिल्हा परिषद शाळेत अनेक दिवसांपासून एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एका आठवड्यात शाळेला शिक्षक मिळाला नाही तर, शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती सदस्य विकास वासनिक यांनी दिला आहे.
सावरी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत.शाळेत पटसंख्या ४० असून,या ठिकाणी दोन शिक्षकांची गरज आहे.मात्र काही दिवसांपासून शाळेत एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेचा भार आलेला आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सावरी गावा लगत अनेक खासगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत. त्यामुळे शिक्षका अभावी पालक आपल्या पाल्याचा लगतच्या खासगी शाळेत प्रवेश करू शकतात. त्यामुळे पटसंख्या कमी होऊन शाळेचे वर्ग तुटू शकतात. परिणामी पालकांनी वेळोवेळी पंचायत समितीकडे दुसऱ्या शिक्षकाच्या नियुक्तीची मागणी केली आहे.
आठवड्याभरात शाळेला शिक्षक मिळाला नाही तर,शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती सदस्य विकास वासनिक,सभापती प्रणाली सार्वे, प.स.सदस्य मनिषा हलमारे, सरपंच सचिन बागडे,उपसरपंच मंगेश धांडे,ग्रामपंचायत सदस्य आदित्य बागडे, मोहन रेहपाडे व समस्त पालकांनी केला आहे.
कित्येक दिवसापासून शाळेत पटसंख्येनुसार दुसरा शिक्षक नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक एक आणि वर्ग ४ त्यामुळे एका शिक्षकांनी किती वर्गाला शिकवावे? मागणी करूनही जर शिक्षक मिळाला नाही? तर आठवडाभरात शाळेला कुलूप ठोकून उपोषण करू.
विकास वासनिक पंचायत समिती सदस्य
मुरमाडी/सा. क्षेत्र.