टीम सिटी टाइम्स लाखनी | नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ ऑक्टोंबर रोजी शिर्डी येथील कार्यक्रमादरम्यान वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची उपस्थिती राहणार आहेत. राज्यात एकूण ९३.०७ लाख शेतकरी लाभार्थी आहेत.राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता दिली आहे. पहिल्या हप्त्याच्या वितरणासाठी महाआयटीने लावलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणीसाठी केलेल्या दिरंगाईमुळे पहिल्या हप्त्यासाठी उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील ८५.६० लाख शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेचा १४ वा हप्ता मिळाला होता. मात्र कृषी विभागाच्या अभिलेख तपासणी नंतर राज्यातील लाभार्थ्यांची संख्या ९३.०७ लाख एवढी झाली आहे. अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे.