अतुल नागदेवे लाखनी : लांबणीवर गेलेल्या मान्सूनने मृग नक्षत्राच्या शेवटी तालुक्यात हजेरी लावली. हलक्या स्वरूपाच्या मृग धारा बरसल्या.त्यामुळे बळीराजा सुखावला.शेतकऱ्यांनी खरिप हंगामात धान पिकाच्या पेरण्या केल्या.
मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू शेतीमधील अक्षरशःधानाचे निघालेले अंकुर वाळून जात असल्याचे चित्र आहे. परिणामी लाखनी तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहेत.तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम हा शेतकऱ्यांना रडवणार काय? अशी शेतकऱ्यांची स्थिती आहे.
त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले जाईल की काय? असे चित्र सध्या दिसत आहे.तालुक्यातील अनेक गावामध्ये अशीच परिस्थिती असून जेमतेम मान्सूनच्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीपच्या पेरण्या केल्या आहेत.जेमतेम त्यांचे पीक उगवले तर काही ठिकाणी धानाचे रोप उगवलेच नाही. मान्सूनचे उशिरा आगमन झाल्याने ट्रॅक्टर तथा बैलजोडीच्या सहाय्याने लगबगीने शेतकरी बांधवांनी पेरणी केली.
जर आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर शेतात पेरलेले पीक वाळून जाईल व दुबार पेरणी करावी लागेल अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.मोठ्या दमदार मुसळधार पावसाची चातकासारखी वाट बळीराजा बघत आहे.
पावसाने दडी मारली असल्याने काही ठिकाणी शेतकरी तुषार सिंचनाने धान पऱ्हे जगविण्यासाठी पाणी देत असल्याचे दिसून येत आहे. पावसाने उघडीप दिल्याने लाखनी तालुक्यात धानाचे पऱ्हे वाळत आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडलेला आहे. पावसाने काही दिवसांपासुन दडी मारल्याने उरलेसुरले पऱ्हे वाळते की काय? यामुळे शेतकरी अधिकच चिंतातूर आहे.