टीम सिटी टाइम्स लाखनी | भटके विमुक्त समाजाच्या विविध शासकीय योजनाची माहिती व्हावी,त्यांचे जीवनमान उंचावे, जीवनामध्ये स्थैर्य निर्माण व्हावे याकरिता विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मासेमारी, नीलक्रांती योजना,वयोश्री योजना अशा अनेक शासकीय योजना सुरू आहेत.मात्र,तळागाळातील समाजातील भटके विमुक्त लोकांपर्यंत योजनाबद्दल माहिती पोहोचत नसल्याने योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. या समाजामध्ये आशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
बारावी मध्ये प्रवेश करणारे विद्यार्थी संख्या कमी आहे.यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता समाज बांधवांना कमलीचा सामना करावा लागतो. आजघडीला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये घरकुलांचे अर्ज २५ हजाराच्या वर आहेत.मात्र,कागदपत्रांच्या कमतरतेमुळे फक्त ४ हजार घरकुलांना प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊ शकली आहे.
या अडचणी लक्षात घेता, डॉ.अविनाश नान्हे यांच्या नेतृत्वात दि.६ जुलै रोजी बडगे सभागृह केसलवाडा/फाटा, लाखनी येथे शासकीय योजनांचा माहिती मेळावा आयोजित करण्यात आला होता. सोबतच फॉर्म वाटप कार्यक्रम आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.सदर मेळाव्याला उत्स्फूर्तपणे लाखनी तालुक्यातील भटक्या विमुक्त, समाज बांधवांनी एकत्र येऊन कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता.
यावेळी, मासेमारी सोसायट्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर अनेक ठराव घेण्यात आले. त्यात तलावामध्ये होणारे अतिक्रमण, गाळ साचल्यामुळे व अतिक्रमणामुळे १०० एकराचा तलाव ५० एकरचा राहिलेला आहे. परिणामी मासेमारी उत्पादन क्षमता ही कमी झालेली आहे.
या संदर्भामध्ये मोठे आंदोलन उभे करण्याचा ठराव घेण्यात आला. या मेळाव्या करिता मच्छीमार संस्थेचे यशवंत नान्हे, सुरेश खंगार, संजीव भुरे, सुभाष उके, प्रकाश बावनथडे, मंगल मोहनकर, तुळशीराम कामथे,अमित खेडेकर,वामन दिघोरे,कैलास नान्हे,अशोक खेडीकर, नामदेव दूधपचारे अनमोल मेश्राम, शामराव मेश्राम, मनोहर कोल्हे,दिलीप नान्हे, आत्माराम शेंडे, भीमराव नान्हे, ताराचंद मेश्राम आदीनी परिश्रम घेतले.