सौरभ राऊत लाखांदूर | गत ३ जुलै रोजी लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद शाळेत वयाचे सहा वर्ष पुर्ण होतात इयत्ता पहिल्या वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थीनीचा सॅनेटरी पॅड डिस्पोजल मशीनच्या ॲल्युमिनियम कॉईलला स्पर्श झाल्याने विद्युत करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी मुख्याध्यापक एन.टी. भावे यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे पुयार येथील जिल्हा परिषद शाळेत फक्त ४ शिक्षक कार्यरत असून, २ शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गुरुजी कधी येणार साहेब? अशी विचारणा पालक वर्गातून होत आहे.
दरम्यान, तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद शाळेत १ ते ७ वर्गासाठी १४४ विद्यार्थी पटसंख्या संख्या असुन, या जिल्हा परिषद शाळेत ६ शिक्षकांना मान्यता आहे. मात्र, आता फक्त ४ शिक्षक कार्यरत आहेत. येथील शिक्षकांचे पदे रिक्त असल्याने मुलांचे योग्य शिक्षण होत नाही. त्यामुळे मुले शिकतील कसे असाही प्रश्न पालकांना पडला आहे.
एकंदरीत, पुयार येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने बदलीचा प्रस्ताव टाकला आहे. अशीही चर्चा असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील बहुतेक शाळेत प्राथमिक शिक्षकांचीच पदे रिक्त आहेत.
एकापेक्षा जास्त वर्ग सांभाळणाऱ्या गुरुजींना एवढे विद्यार्थी सांभाळणेच अवघड जात आहे. त्यामुळे पोरगं काहीच शिकत नसल्याची ओरड पालक करीत आहेत, तर आमच्या शाळेत गुरुजी कधी येणार साहेब? अशी विचारणा पालक व विद्यार्थी करतानाही दिसताहेत.
शाळेतील शिक्षकांवर वाढला ताण
शिक्षकांना एकापेक्षा जास्त वर्ग सांभाळावे लागत आहेत. त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण तर वाढत आहेच. यासोबतच मुलांच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होतो आहे.
रिक्त जागांचा विद्यार्थ्यांना फटका
शाळांतील शिक्षकांची पदे रिक्त असल्याने दोन ते तीन वर्ग एकाच शिक्षकाला सांभाळावे लागतात. शिक्षक दुसऱ्या वर्गावर गेले की एक वर्ग तासिका होत नसल्याने तसाच राहतो. यामध्ये विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत असून, अर्धाही अभ्यासक्रम होत नाही.
नवीन शिक्षक आले आहेत. मात्र, शिक्षकांची कार्यशाळा झाली नसून, १५ ऑगस्टपूर्वी कार्यशाळा होईल. पुयार जिल्हा परिषद शाळेचा नाव प्रथमच दिला आहे. आणि शिक्षक कार्यशाळा झाल्यानंतर येतील.
- तत्त्वराज अंबादे
गटशिक्षणाधिकारी लाखांदूर