टीम सिटी टाइम्स लाखनी | समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करून लोकसेवा करण्याचे काम हाती घेतले आहे. यातून परिवर्तन घडवून आणण्याचा मानस आहे. विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून हे साध्य होऊ शकते. त्यामुळेच आपण पक्षाकडे साकोली विधानसभेच्या उमेदवारीसाठी विनंती केल्याची माहिती भाजपाचे डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी दि.१५ जुलै रोजी लाखनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
उच्च विद्याविभूषित आणि विदेशात नोकरी करीत असलेल्या डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी लोकसेवेसाठी स्वगृही परतण्याचा निर्णय घेत, मागील बऱ्याच महिन्यांपासून जणसंपर्क वाढविला. पत्रपरिषद घेऊन, त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले.
साकोली विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांच्या बाबतीत त्यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. भेलमुळे अनेकांना मनःस्ताप सहन करावा लागला. अनेक कुटुंबांमध्ये रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला. भेलचा विषय मार्गी लावणे किंवा त्या ठिकाणी नवीन उद्योग निर्माण करणे हाच उपाय या परिसरातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकतो असे ते म्हणाले.
शेतकरी, युवक, महिला अशा सर्वांच्या प्रश्नांना घेऊन वाचा फोडण्यासाठी काम करीत आहे. दरवर्षी विविध आरोग्य विषयक शिबिर, विद्यार्थ्यांना पुस्तक, वह्यांचे वाटप असे समाजोपयोगी उपक्रम राबवत असतो. अशा कामांना अधिक गतिमान करीत मुर्तरूप आणण्याच्या दृष्टीने काही गोष्टींची असते. म्हणूनच विधानसभेसाठी आपण पक्षाकडे उमेदवारीची मागणी केल्याचे डॉ. सोमदत्त करंजेकर म्हणाले.