टीम सिटी टाइम्स भंडारा | केंद्र शासनाच्या पीएम किसान (Pm Kisan) सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये आणि राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी (Namo Mahasanman) महासन्मान निधी’ च्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापोटी चार हजार रुपयांचा लाभ आज २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील मौजे भारी येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते ४:३० वाजता राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहेत.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने फेब्रुवारी २०१९ पासून ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (Pm Kisan) योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार शेतकरी कुटुंबास रुपये दोन हजार प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रुपये सहा हजार त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
या योजनेचा माहे डिसेंबर-मार्च २०२४ कालावधीतील सोळावा हप्ता प्रधानमंत्र्यांच्या हस्ते २८ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता यवतमाळ जिल्ह्यातील मौजे भारी येथे आयोजित कार्यक्रमात वितरित करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण ८७.९६ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात रुपये १९४३.४६ कोटींचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.
केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान (Namo Mahasangh) योजने’ ची अंमलबजावणी राज्यात सुरू असून शेतकरी कुटुंबास रुपये दोन हजार प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रुपये सहा हजार देण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने २८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशभर ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार जिल्हा, तालुका व गावपातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्र, सामाईक सुविधा केंद्रांवर पीएम किसान उत्सव दिवस साजरा होणार आहे.