टीम सिटी टाइम्स लाखनी | झाडीपट्टीचा भूप्रदेश म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या साकोली विधानसभा क्षेत्रात नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात असताना प्रक्रिया उद्योगांकडे लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
भरीस भर म्हणून पायाभूत सुविधांची कमतरता, एमआयडीसी ची वानवा तसेच नद्यांना येणाऱ्या महापुरामुळे पिकांचे नुकसान त्यामुळे शेतकरी अधोगतीला जात असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष केल्याने साकोली विधान सभा क्षेत्राचा विकास खुंटला. असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी पत्र परिषदेत सांगितले.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेबाबद पत्रकारांशी वार्तालाप करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे शनिवारी दि. २४ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह लाखनी येथे पत्रकारांशी वार्तालाप करतांना वरील बाबीचा उहापोह केला.
साकोली विधानसभा क्षेत्रात लाखनी, साकोली, लाखांदूर ह्या तालुक्यांचा समावेश होतो. या तालुक्यातून चुलबंद व वैनगंगा नदी प्रवाहित होते. तर वनसंपदा व सिलिमनाइट सारखा खनिज साठा या भागात भरपूर प्रमाणात आहे. तसेच खरीप हंगामातील मुख्य पीक धान असून मोहफुल व तेंदुपत्त्यामुळे या विधानसभा क्षेत्रातील मजूरांना रोजगार उपलब्ध होतो.
पण येथील लोकप्रतिनिधींनी मोहफुलांसह धानावर प्रक्रिया करणारे उद्योग आणले नसल्यामुळे येथील युवक रोजगारापासून वंचित राहिले आहेत. २०१३ मध्ये या क्षेत्रात अवजड उद्योग मंत्रालयाचे वतीने “भेल” प्रकल्प आणण्यात आला.
अवजड उद्योग मंत्रालयाच्या प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. पण त्यानंतरच्या प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या नाही. तसेच सत्तांतर झाले. सत्तांतरामध्ये या भागातील लोक प्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे भेल प्रकल्प रखडला असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी सांगितले.
विद्यमान लोकप्रतिनिधींनी या क्षेत्रातील भोळ्याभाबळ्या जनतेला भुलथापा देऊन विकासापासून वंचित ठेवले आहे. साकोली हा इंग्रज कालीन तालुका असतांनाही पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. विद्यमान लोकप्रतिनिधी मागील २५ वर्षापासून या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत असताना सुजलाम् सुफलाम का केला नाही ? हे कळण्यास मार्ग नाही.
केंद्र राज्य शासनाकडून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्या योजना साकोली विधानसभा क्षेत्रात आणण्यास आमचे लोकप्रतिनिधी कमी पडत असल्यामुळे या भागाचा विकास झाला नाही.
अशी खंतही भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी बोलून दाखविली. महाविकास आघडीत ३ घटक पक्ष असताना विद्यमान आमदार मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहत असतात. असा टोलाही त्यांनी लगावला.
विधानसभा अध्यक्ष या सारखे संवैधानिक पद भूषविणाऱ्यांनी साकोली विधानसभा क्षेत्रात उद्योगधंद्यासह दळणवळणाची वानवा ठेवली आहे. ही सत्यता नाकारता येत नाही.
असेही भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी पत्र परिषदेत सांगितले. साकोली विधानसभा क्षेत्रात सुपीक जमीन, पाणी, खनिज संपत्ती व वनक्षेत्र उपलब्ध आहे.
क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच बाबींची उपलब्धता असताना लोकप्रतिनिधींच्या नाकारतेपणामुळे साकोली विधानसभा क्षेत्राचा विकास खुंटला मोठमोठ्या पदांची स्वप्ने पाहणाऱ्यांना विकासाकडे लक्ष पुरविले असते तर निश्चितच त्यांना मोठी पदेही मिळाली असती.
पण जनतेला चॉकलेट सह भूलथापा देऊन विधानसभा क्षेत्राची वर्तमान लोक प्रतिनिधींनी वाट लावली असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी सांगितले.
क्षेत्रात विकासाची गंगा आणायची असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीच आणू शकतात. असेही त्यांनी सांगितल्याने अप्रत्यक्षपणे भाजपाला साथ देण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी केले म्हटल्यास वावगे ठरणार नाही.