टीम सिटी टाइम्स लाखनी | येथील हिरो शोरुम च्या इमारतीचे चौथ्या मजल्यावर काम करीत असताना खाली पडून उपचारादरम्यान मजुराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.११) दुपारी २:३० वाजता चे दरम्यान उघडकीस आली.
मृतक मजुराचे नाव अतुल दीपक भोयर (३२) रा. नागपूर नाका, भंडारा असे आहे. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
लाखनी येथे हिरो शोरुम इमारतीचे चौथ्या मजल्यावरील बांधकाम सुरू असून बांधकामाचे कंत्राट भंडारा येथील बांते नामक इसमास देण्यात आले असून त्यावर काम करणारे मजूरही भंडारा येथील आहेत.
सोमवारी चौथ्या मजल्यावर काम करीत असताना मजुराचा तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. सहकाऱ्यांनी त्यांना भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी भर्ती केले.
पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वैद्यकिय अधिकाऱ्याच्या अहवालावरून पोलिस ठाणे भंडारा येथे ००/२०२३ अन्वये नोंद करून घटनास्थळ हे लाखनी येथील असल्याने मर्ग डायरी लाखनी पोलिस ठाण्यात पाठविण्यात आली.
लाखनी पोलिसांनी मर्ग क्रमांक ३४/२०२३ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी मृतकाचे आई मीना दिलीप भोयर, मृतकाचे पत्नी मंगला अतुल भोयर रा. भंडारा तसेच मृतकाचे सासरे अशोक पांडुरंग उरकुडे आसगाव यांना बोलावून त्यांना
विचारपूस करून बयान नोंदविले असता मृतक अतुल भोयर याचे मरणाबाबद कोणताही आक्षेप नसल्याचे बयान दिले असल्याने पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार निलेश रामटेके पुढील तपास करीत आहेत.