टीम सिटी टाइम्स भंडारा | येथील नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक नरुल हसन यांचे जिल्ह्यातून अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेशान्वये पोलिस यंत्रणा सज्ज असून ओरिसा राज्यातून नाशिक(महाराष्ट्र) येथे चारचाकी वाहनातून अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याचे गुप्त माहितीवरून भंडारा पोलिसांनी ७ प्लास्टिक चे बोरीतून नेत असलेला १६७.१०० कीलोग्रॅम गांजा किंमत २५ लाख ६ हजार ५०० रुपये आणि
चारचाकी वाहन किंमत २० लाख असा एकूण ४५ लाख ६ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल भंडारा पोलिसांनी जप्त केल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. आरोपींची नावे सुमित सुभाष धोरवे(३३) रा. आळंदी देवाची-तालुका खेड, जिल्हा पुणे, रवींद्र कृष्णा शिंदे(३६) रा. गंगापूर रोड शिवसृष्टी कॉलनी नाशिक, तुषार भोसले रा. आडगाव शिवार नाशिक, सूरज नावाचा इसम रा. नाशिक अशी आहेत. या कारवाईने अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
एक ग्रे रंगाची महिंद्रा एक्सयुव्ही ५०० क्रमांक एमएच १५ ईपी ४३७२ ने २ इसम भंडारा-नागपूर रस्त्याने अवैध गांजाची वाहतूक करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून भंडारा चे पोलिस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांनी पथक नेमून सदर वाहनाचा भंडारा वरून नागपूर कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) परिसरात
शोध घेत असताना सदर वाहन बीटीबी मार्केट परिसरातील यार्ड मध्ये पार्किंग केले असल्याचे आढळले. वाहनामध्ये २ इसम मिळाले. त्यांचे नाव व पत्ता विचारले असता सुमित धोरवे(३३) रा. आळंदी देवाची, तालुका खेड जिल्हा पुणे व रवींद्र कृष्णा शिंदे(३६) रा. गंगापूर रोड, शिवसृष्टी कॉलनी नाशिक असे सांगितले.
या दोघांवरही पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडीची तपासणी केली असता गाडीचे मागील भागात एकूण ७ पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक बोऱ्या असल्याचे आढळून आल्याने या बाबद पोलिस अधीक्षक नरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांना माहिती देण्यात आली. त्यांनी एनडीपीएस कायद्याचे तंतोतंत पालन करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गाडीतील प्लास्टिक बोरीची पाहणी केली असता त्यात कडीदार देठ असलेला उग्र वास येणारा ओलसर, चामट गांजा मिळून आला.
गांजाबाबद विचारपूस केली असता उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली. पण पोलिस खाक्या दाखविताच तुषार भोसले व सूरज यांचे सांगण्यावरून ओरिसा राज्यातून गांजा आणून नाशिक(महाराष्ट्र) येथे घेऊन जाणार असल्याची माहिती सुमित व रवींद्र यांनी पोलिसांना दिली.
गांजाचे वजन केले असता १६७.१०० किलोग्रॅम किंमत २५ लाख ६ हजार ५०० रुपये तसेच चारचाकी वाहनांची किंमत २० लाख रुपये असा एकूण ४५ लाख ६ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुमित धोरवे व रवींद्र शिंदे यांचेविरुद्ध भंडारा पोलिसांनी अपराध क्रमांक ८७३/२०२४ कलम ८(सी), २०(बी)(||), २९ एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल तपास करीत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक दीपक चालुरकर, परिविक्षाधिन पोलिस उपनिरीक्षक हनुमंत फरताडे, पोलिस हवालदार क्रीष्णा बोरकर, बालाराम वरखडे, विजय डोयले, राजेश पांडे, महेश सूर्यवंशी, पोलिस नायक अजय कुकडे, सुनील राठोड, पोलिस शिपाई नरेंद्र झलके, कोमल ईश्वरकर यांनी केली. या कारवाईने भंडारा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी अवैध व्यवसायिकांचे मात्र धाबे दणाणले आहेत.