टीम सिटी टाइम्स भंडारा | दि.२ जून : ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पलाडी परिसरात सर्व मतयंत्र स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून याच ठिकाणी ४ जून रोजी मतमोजणी सकाळी आठ वाजता पासून सुरू होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व त्यांच्या अधिनस्त वरिष्ठ अधिकारी यासंदर्भात दररोज आढावा बैठक घेत असून सोमवारी दुपारपर्यंत सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी पूर्णतः कार्यरत होणार आहे.
मतमोजणी करताना आवश्यक असणारा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग, माध्यमांचा सहभाग, निवडणूक निरीक्षक आणि भारत निवडणूक आयोगाला तातडीने देण्यात येणारी माहिती, यासाठी आवश्यक पूरक तांत्रिक व भौतिक यंत्रणा या परिसरात तयार करण्यात येत आहे.
सध्या पलाडी येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमसाठी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. दर्शनी भागात सहा स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास सुरू असतात. मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूममध्ये कोणालाही प्रवेश नसतो. तसेच २४ तास कॅमेऱ्याच्या माध्यमातून निगराणी केली जाते.
२००० कर्मचारी नियुक्त
मतदान प्रक्रियेच्या तुलनेत मतमोजणी प्रक्रियेसाठी कमी कर्मचारी लागतात. मात्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्व नोडल अधिकारी यांच्याकडे अधीनस्त कर्मचारी, संपर्क व सुरक्षा यंत्रणा तसेच भोजन व्यवस्थेतील कर्मचारी, पार्किंग विषयक व्यवस्था राखणारे कर्मचारी, पोलीस बंदोबस्तातील अधिकारी कर्मचारी या सह सर्व कर्मचारी अधिकाऱयांची संख्या साधारण २००० असणार आहे.
८ वाजता मतमोजणीला प्रारंभ
सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. प्रथम पोस्टल बॅलेट पेपरची मोजणी आहे. त्यासोबतच एकाच वेळी सहा मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ होईल. साधारणतः साडेदहा ते अकराच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल अपेक्षित आहे.
मतमोजणी संदर्भातील प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या निर्देशित सूत्रानुसार व सूचनेनुसार चालते यासाठी निवडणूक विभागाकडून नेमणूक करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डोळ्यात तेल घालून संपूर्ण यंत्रणेकडून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत मतमोजणी प्रक्रिया पार पाडतात. 4 जूनच्या सायंकाळपर्यंत सर्व फेऱ्यांची मतमोजणी पार पडण्याची शक्यता आहे.
किती टेबलवर मतमोजणी होणार ?
भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. एका विधानसभा साठी १४ टेबल असे एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी २० टेबल आहेत. आणि सर्व्हिस मतदारसाठी १४ असे एकूण ११८ टेबलवर मतमोजणी होणार आहे.
कोण करते मतमोजणी?
प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी असतात.यामध्ये मायक्रो ऑब्झर्वर म्हणजे सूक्ष्म निरीक्षक , दुसरे सुपरवायझर म्हणजे मतमोजणी पर्यवेक्षक, तिसरा काउंटिंग असिटंट म्हणजे मतमोजणी सहाय्यक असेल. राजकीय पक्षाच्या एकूण ५०७ प्रतिनिधींचा देखील या मतमोजणी प्रक्रियेत समावेश असेल.
एकूण फेऱ्या कशा ठरतात?
प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किती केंद्र आहे त्याला भागीले टेबलची संख्या यावरून फेऱ्या ठरतात. उदाहरणार्थ विधानसभा क्षेत्रात ४३३ मतदान केंद्र आहेत. त्यामुळे ४३३ भागीले १४ बरोबर ३०.९२म्हणजे ३१ फेऱ्या होतील. थोडक्यात मतदार संघात सर्वात कमी तिरोडा २२ तर सर्वात अधिक ३१ फेऱ्या ह्या भंडारा विधानसभा क्षेत्राच्या होणार आहे.३१ फेऱ्यानंतर पूर्ण निकाल लागेल.
मतमोजणीच्या साठी जिल्हा प्रशासनाने अधिकारी कर्मचारी यांचे तीन वेळा सलग आणि सविस्तर प्रशिक्षण घेतले आहे तसेच त्यासोबतच प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक आणि मॉकड्रील सुद्धा घेण्यात आलेली आहे