टीम सिटी टाइम्स लाखनी : शहरातील सेलोटी रोड परिसरातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून ते मानेगाव बेळा पर्यंत मार्ग जोडणारा पानदान रस्त्याचे काम मागील काही दिवसापूर्वी करण्यात आले होते. या रस्त्यावर आदर्श नगर कडून सेलोटीकडे जाणाऱ्या नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम झाले होते. बंधाराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे मागील तीन वर्षापासून बंधारा कोसळला असून लाखनी, मानेगाव-बेळा येथे जाणारा मार्ग शेतकऱ्यांसाठी आणि शेतीपूरक वाहनांसाठी बंद झालेला आहे.
याप्रकरणी स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा तहसील कार्यालय लाखनी येथे अर्ज विनंती करून काही फायदा झालेला नाही. त्यामुळे नाराज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे उन्हाळ्यामध्येच निवेदन सादर केले होते. परंतु पावसाळा लागण्यापूर्वी शेतकऱ्यांना सोईचे व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली होती.
पावसाळ्या लागण्यापूर्वी बंधाऱ्याचे काम पूर्ण व्हावे ही शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे भर पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर शेतकरी नाराज असून मुख्यमंत्री यांनाही निवेदन पाठविण्यात आहे.
त्यामुळे आता तरी जिल्हाधिकारी साहेब लक्ष देणार का? अशी ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. प्रशासनाने एकदा तरी लक्ष देत, चौकशी करून परिस्थितीचा आढावा घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.