टीम सिटी टाइम्स लाखनी : लगतच्या मुरमाडी/ सावरी येथील उज्वलनगर परीसरात दि.४ मार्चला घडलेल्या प्राणघातक हल्ल्यातील जखमी नामे शुभम प्रमोद टांगले (वय २७ वर्षे,रा. उज्ज्वलनगर,मुरमाडी/सा.) प्रकरणातील आरोपी रोहीत विष्णु देशमुख (वय २५ वर्षे,रा.केसलवाडा/वाघ.) याची बेकायदेशीर अटकेच्या कारणावरून लाखनी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी रा.सु.धडके यांच्या न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली.
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी कि,दि.४ मार्चला शुभम टांगले हा त्यांच्या घरी आपल्या बहिनीसोबत टी. व्ही.बघत असतांना रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन आल्यामुळे तो फोनवर बोलत घराजवळील नहराकडे गेला.थोड्याच वेळात आरोपी रोहीत देशमुख हा जखमीच्या घरी आला व रागाने जखमीच्या बहिनीला “तुझ्या भावाला चांगला धडा शिकविला, त्याला सांभाळुन ठेव”असे बोलुन निघुन गेला.त्यामुळे जखमीची बहिन घरातुन बाहेर आली व नहराकडे जावुन बघितले असता तिच्या भावाला गळयाला जखम होवुन तो रक्तबंबाळ अवस्थेत दिसला.
जखमीच्या बहिनीने माहिती घेतली असता घटनास्थळी उपस्थित जखमीच्या मित्राने सांगीतले कि,आरोपी रोहीत देशमुखने धारदार शस्त्राने गळयावर वार करून शुभमला गंभीर जखमी केले व स्कुटीने पळुन गेला.लगेच जखमीला ग्रामीण रूग्णालय लाखनी येथे भरती केले.परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी भंडारा येथे रेफर केले.सध्या जखमीवर भंडारा येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
याप्रकरणी जखमींच्या वडीलांनी पोलीस स्टेशन लाखनी येथे आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.या तक्रारीवरून लाखनी ठाण्यात आरोपी रोहीत देशमुख यांच्या विरोधात कलम १०९(१) भारतीय न्याय संहिता२०२३ अंतर्गत गुन्हा नोंद करून तपास सुरू केला व आरोपीला अटक केली.
आरोपीच्या अटकेनंतर लाखनी पोलिसांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी लाखनी यांच्या न्यायालयात आरोपीला उभे करून तिन दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली असता आरोपीच्या वकिलांनी सदर प्रकरणातील आरोपीला अटक करतांना पोलीसांनी भारतीय संविधानाच्या कलम २२ च्या अंतर्गत देण्यात येणा-या आरोपीच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे. तसेच आरोपीच्या अटकेची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
न्यायालयात त्याअनुषंगाने आरोपीच्या वकिलांनी काही सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले.सदर बाब न्यायालयाने मान्य करून आरोपीला पोलीसांनी केलेली अटक बेकायदेशीर ठरवुन आरोपी रोहीत देशमुख याची जामीनावर मुक्तता केली.सदर प्रकरणात आरोपीतर्फे ऍड. धनंजय बोरकर यांनी काम पाहीले.