टीम सिटी टाइम्स लाखनी | ग्रामपंचायत कोलारी (पटाची) येथील जिल्हा परिषद शाळेत मागील अनेक दिवसांपासून एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा निषेध म्हणून, शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने कोलारी गावचे सरपंच उमेश झंझाड यांनी दि. २१ जुलै रोजी खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.
या, जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यत वर्ग आहेत. पटसंख्या ४८ असून, या ठिकाणी दोन शिक्षकांची नियुक्ती आहे. मात्र, मागील एक वर्षापासून येथील एक सहशिक्षिक प्रतिनियुक्तीवर गेल्यामुळे मागील एक वर्षभरापासून एकच शिक्षकावर शाळेचा भार आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संतप्त पालकांनी वेळोवेळी पंचायत समितीकडे शिक्षकाच्या नियुक्तीची मागणी केली.
मात्र, शिक्षण विभागाने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थ, पालकांनी अखेर शाळेला कुलूप ठोकू असे निवेदन दिले.शाळेला शिक्षक मिळणार नसतील तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे काय, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने रिक्त पद भरले नाही.
यामुळे मागील अनेक दिवसांपासून पालकवर्गात कमालीचा असंतोष आहे. निवेदन दिल्याच्या आठवडाभरात, शाळेला शिक्षक नाही मिळाले तर, शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने कोलारी (पट) येथील सरपंच उमेश झंझाड यांनी लाखनी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी नेताजी धारगावे यांना दिला आहे.