टीम सिटी टाइम्स लाखनी : अडयाळ वनपरिक्षेत्र अंतर्गत सहवनक्षेत्र किटाळी येथील मांगली गावाजवळच्या शेतीलगत एका वाघाने शेळीला ठार करून हिंस्त्ररूप दाखविल्याने परिसरातील नागरिकांमध्ये वाघाच्या धास्तीने भीतीचे वातावरण पसरले आहे. पाच दिवसांपूर्वी याच परिसरात किटाडी-मांगली या जंगलव्याप्त भागात पट्टेदार वाघीण व तिच्या दोन बछड्यासह फिरत असल्याचे दिसून आले होते.
12 नोव्हेंबर मंगळवारला सायंकाळी वाघिणीने तलावाच्या काठावर गायीची शिकार केली. त्यामुळे पशुपालकांत भीतीचे वातावरण असून वनविभाग वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. भंडारा जिल्ह्यात ही वाघीण वनविभागाला परिचित असलीतरी वनविभागाची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहे.
जंगलव्याप्त परिसरातील नागरिकांनी वाघाची दहशत वाढली असल्याने धास्तीने खरीप हंगामातील शेतीची धान कापणी व मळणीची कामे कशी करावी, असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. भंडारा वनविभागाअंतर्गत अडयाळ वनपरिक्षेत्राच्या जंगलात गेल्या महिना भरापासून दोन वाघाचा बछड्यासह वावर असल्याचे दिसून येते.
मांगली परिसरातील शेतकरी व पशुपालक शेतीच्या कामासाठी तसेच गुरे चराई करीता त्यांचे या भागात आवागमन असते. खरीप हंगामातील धान मळणी, कंपनी व इतर कामे बिनधास्तपणे होण्यासाठी वनविभागाने मांगली परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या वाघांचा बंदोबस्त करावा, दहशत कमी करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी मांगली येथील रोजगार सहायक उत्तम चौधरीसह या भागातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.
घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक येवतकर, क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर, वनरक्षक गायकवाड,वनरक्षक नितीन पारधी, वनरक्षक रंगारी म्याडम, वनरक्षक देशमुख, वनरक्षक मंगला शहारे आणि वनमजूर घटनेवर लक्ष ठेऊन आहेत.
वनविभागाचे नागरिकांना आवाहन
किटाळी वनपरिसरातील नागरिकांनी सावध राहून वन्यप्राण्यांना त्रास होईल,असे कोणतेही कृत्य करू नये,जंगल परिसरात वाघ बघण्यासाठी धाडसी साहस करू नये. तसेच घरा शेजारील शेकोटी पेटवून पशुपालकांनी आपल्या पाळीव प्राण्यांकडे लक्ष ठेवावे गरज पडल्यास वनविभागातील कर्मचाऱ्यांना कळवावे अशा आव्हाहन नागरिकांना केले आहे.