टीम सिटी टाइम्स लाखनी : ऑक्टोबर महिना संपताच हवेत गारवा निर्माण झाला आहे. तरी कधी उन्हाचा तडाखा तर कधी आभाळात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. वातावरणात होत असलेल्या या बदलामुळे शहरात रोगराईचे प्रमाण वाढले आहे. त्यात आता डासांनी भर घातली आहे.
सायंकाळी हे डास आक्रमक होत असल्याने फेरफटका मारायला बाहेर पडलेले नागरिक नको तो फेरफटका, असे म्हणत घरात बसणे पसंत करत आहेत. तर, शहरात सायंकाळी सहानंतर डासांची भुणभुण वाढत असल्याने मलेरिया आणि डेंग्यूच्या भीतीने पालक आपल्या मुलांना घरी घेऊन जात आहेत.
मागील काही दिवसांपासून हवामानात बदल झाल्याने रोगराई वाढली आहे. लाखनी शहरात डासांची उत्पत्ती वाढत असून, दक्षता घेण्याचे आव्हान सातत्याने करण्यात येत आहे.
सध्या दिवाळीच्या सुट्टी असल्याने शहरातील पार्क परिसर बच्चेकंपनीसह पालकांच्या गर्दीने गजबजून जातात. शहरातील एकमेव पार्क म्हणजे ऑक्सिजन पार्क दिवसभर खुली नसल्याने फक्त काही वेळेवरच उघडी ठेवली जातात. सायंकाळच्या सुमारास याठिकाणी अनेक बच्चापार्टी फिरायला येतात मात्र, यावेळी डासांची भुणभुण सुरू होते त्यामुळे पालक आपल्या मुलांना जास्त वेळ पार्कमध्ये खेळू देत नाही.
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ ला सामोरे जाताना स्वच्छतेचा संदेश जनमानसात व्यापक स्वरूपात प्रसारित व्हावा, यासाठी प्रशासन आक्रमक झाले असले, तरी सध्या डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत असताना आता त्यात डेंग्यू व मलेरियाने शिरकाव केल्याचे दिसत आहे.
शहरात सायंकाळी सहानंतर डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याचा फटका अनेकांना बसत आहे. मच्छरांचा त्रास होऊ नये म्हणून नागरिक मच्छरदाणी, अगरबत्ती यांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत.