टीम सिटी टाइम्स लाखनी : शासनातर्फे दिव्यांग, विधवा, अनाथ याकरीता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये अनुदान देण्यात येतो. सदर अनुदान अल्प असून देखील, वेळेवर उपलब्ध होत नाही.खरंतर या अनुदानामुळे दिव्यांग, अनाथ, विधवा महिला आपला उदरनिर्वाह भागवितात.
सध्या दिवाळी सण संपूर्ण देशात मोठ्या आनंदाने साजरी करण्यात येत आहे. या पाश्वभूमीवर निराधारांना अनुदान वर्ग करण्यात यावा याकरिता अपंग क्रांती आंदोलन समीतीकडून (दि.31) ऑक्टोबर रोजी तहसीलदार लाखनी यांच्यामार्फत प्रधान सचिव, मुख्य सचिव, तथा दिव्यांग सचिव मत्रालय मुंबई यांना निवेदन पाठविण्यात आले.
लाडक्या बहिणींना लाभ वेळेच्या पूर्वीच दिला जातो.परंतु अपंग, दिव्यांग, निराधार लाभार्थ्यांना मागित गत दोन महिन्यापासून पेंशन मिळालीच नाही.त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेमधील लाभार्थ्यांना मागील दोन वर्षांपासून केंद्रशासनाचे 200 रुपये अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे राज्यातील दिव्यांग, निराधार लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावे अशी मागणी अपंग क्रांती आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आली.
अन्यथा काळा दिवस म्हणून, शासनाचा निषेध करण्यात येईल. निवेदन देतेवेळी, अपंग क्रांती आंदोलन समितीचे तालुका अध्यक्ष सुनील कहालकर, विनोद चोपकर, सुनील हटवार, रामचंद निर्वाण, प्रेमचंद निर्वाण, जयेंद्र देशपांडे, रवींद्र आगलावे, श्यामदास टिचकुले कैलास गायधनी उपस्थित होते.